
जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर भारतानं याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानं पाकिस्तानवर दबाव वाढला आहे. भारतानं सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती दिली आहे. तसेच अटारी बॉडर देखील बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतानं केलेल्या या कारवाईमुळे पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे, पाकिस्तानच्या पंतप्रधानापासून ते लष्कर प्रमुखांपर्यंत युद्धाच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत, समजा तणाव वाढून जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालचं तर चीन आणि अमेरिका कोणाची बाजू घेणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर सीमेवर हालचाली वाढल्या आहेत. युद्धाचं सावट आहे, अशा परिस्थितीमध्ये चीन पाकिस्तानची साथ देईल असं बोललं जात आहे. मात्र हे चीनसाठी वाटतं तितकं सोपं असणार नाही. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेला टेरिफ वार हे आहे. एकीकडे आमच्यासाठी दोन्ही देश जवळचेच असल्याचं म्हणत अमेरिकेनं या प्रकरणात तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. दुसरीकडे चीन पाकिस्तानला साथ देऊ शकतो असा अंदाज बांधला जात आहे. मात्र त्यातील सर्वात मोठा अडथळा हा अमेरिकेनं चीनवर लादलेलं टेरिफ हे असणार आहे.
सध्या संपूर्ण जगावर अमेरिकेनं लादलेल्या टेरिफच्या संकाटाचं सावट आहे, याचा सर्वाधिक फटका हा चीनला बसला आहे. चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांना अशा परिस्थितीमध्ये भारतीय बाजार पेठेची सर्वाधिक गरज भासणार आहे. अमेरिकेनं तर आधीच तटस्थ भूमिका घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे चीनने जर या युद्धामध्ये पाकिस्तानची साथ दिली तर त्यांना भारतीय बाजारपेठ गमवावी लागण्याची शक्यता आहे. आधीच अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध सुरू आहे, अशा परिस्थितीमध्ये चीनचे पाकिस्तानसोबत कितीही जवळचे संबंध असले तरी देखील त्यांना भारताच्या विरोधात भूमिका घेणं परवडणारं नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये शांत बसणं हाच एकमेव पर्याय चीनसमोर असणार आहे. या दोन्ही देशांसोबत भारताचा व्यापार जवळपास 100 अब्ज डॉलरपेक्षाही अधिक आहे.
चीन देखील तटस्थ राहणार
भारत आणि पाकिस्तान युद्ध झाल्यास चीनला देखील शांतच राहावं लागणार आहे, पाकिस्तानला मदत करणं चीनला चांगलंच महागात पडू शकतं, कारण त्याचं सर्वात मोठं कारण हे आहे, अमेरिका आणि चीनमध्ये सध्या व्यापार युद्ध सुरू आहे. अशा स्थितीमध्ये चीन आणि अमेरिका अशा दोन्ही देशांना भारतीय बाजार पेठेची गरज असणार आहे. 2025 मध्ये आतापर्यंत चीन आणि भारतात दोन्ही बाजुंनी तब्बल 127.7 बिलियन डॉलरचा व्यापार झाला आहे. 2024 -2025 या आर्थिक वर्षात ही उलाढल 118.4 बिलियन डॉलर इतकी होती. जर चीनने भारताविरोधात भूमिका घेतली तर त्यांना हक्काची बाजारपेठ गमवावी लागणार आहे.