Operatin Sindoor : पाकिस्तान विचारही करु शकणार नाही…भारताने पहिल्यांदाच वापरली रेड टीमिंग स्ट्रॅटर्जी, यामध्ये काय खासं?
Operatin Sindoor : भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये प्रथमच रेड टीमिंगची स्ट्रॅटर्जी अवलंबली. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या क्षमतेपलीकडचा विचार आधीच करुन ठेवला होता. भारताने यावेळी रेड टीमिंगची जी स्ट्रॅटर्जी वापरली, ती काय आहे? त्याचा कसा फायदा झाला? ते समजून घेऊया.

भारताने या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवलं. अजूनही हे ऑपरेशन सुरु आहे. या विशेष सैन्य कारवाईसाठी भारताने रेड टीमिंगची रणनिती अवलंबली. रेड टीमिंगचा अर्थ आहे की, एक विशेष टीम, जी शत्रूसारखा विचार करुन आपली योजना बनवते. आपण एक कृती केली, तर शत्रू त्यावर कसं उत्तर देणार याचा विचार ही टीम करते. त्यामुळे ऑपरेशनची तयारी अजून मजबूत होते. सैन्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी ऑपरेशन सिंदूरची योजना बनवताना पाच सीनियर अधिकाऱ्यांची एक रेड टीम बनवण्यात आली होती. या अधिकाऱ्यांची देशाच्या वेगवेगळ्या भागातून निवड करण्यात आली होती. अमेरिका आणि दुसरे देश स्ट्रॅटर्जी आखताना रेड टीमिंगचा वापर करतात. भारतात पहिल्यांदा ऑपरेशनमध्ये या टेक्निकचा वापर करण्यात आला.
भारतीय सैन्याने रेड टीमिंगला विदूर वक्ता नाव दिलं होतं. महाभारतातल्या विदूरपासून प्रेरित हे नाव आहे. विदूर सारख्या बुद्धिमान सल्लागाराप्रमाणे ही टीम ऑपरेशनच्या प्रत्येक रणनितीला चॅलेंज करते आणि संभाव्य धोका लक्षात आणून देते. सैन्याने मागच्यावर्षी ऑक्टोंबरमध्ये आर्मी कमांडर्सच्या कॉन्फ्रेंसनंतर या दिशेने पाऊल टाकलं होतं. 15 अधिकाऱ्यांना रेड टीमिंगचा खास प्रशिक्षण देण्यात आलं आहे. पुढच्या दोन वर्षात ही टीम अजून मजबूत करण्याची योजना आहे.
सैन्याकडे आधीपासून REDFOR युनिट
त्याशिवाय सैन्याचं आधीपासून REDFOR नावाचं एक युनिट आहे. पण रेड टीमिंग REDFOR पेक्षा वेगळी आहे. रेड टीमिंग आपल्या योजनेचा शत्रूच्या दुष्टीकोनातून विचार करते. सैन्याच्या मते, यामुळे भविष्यात ऑपरेशन्स अजून अचूक आणि प्रभावी होतील.
पाकिस्तानपेक्षा पुढचा विचार
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं. पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ उडवण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानने तीन दिवस भारतावर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत. भारताच्या मजबूत एअर डिफेन्स सिस्टिमने हे सर्व हल्ले यशस्वीरित्या परतवून लावले. या सगळ्या संघर्षात भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानच्या क्षमतेपलीकडचा विचार करुन ठेवला होता.
