कपाळ फोडताच जागेवर कोसळले… रिक्षावाल्याने भरदिवसा माजी आमदाराला संपवलं; शहर हादरलं

एका रिक्षावाल्यासोबत झालेल्या वादामुळे माजी आमदाराला आपला जीव गमवावा लागल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.

कपाळ फोडताच जागेवर कोसळले... रिक्षावाल्याने भरदिवसा माजी आमदाराला संपवलं; शहर हादरलं
| Updated on: Feb 15, 2025 | 6:11 PM

बेळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, रिक्षा चालकानं केलेल्या हल्ल्यामध्ये माजी आमदाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. शहरातील खडे बाजार परिसरात ही घटना घडली आहे. आरोपी रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केलं आहे.  घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

समोर आलेल्या माहितीनुसार  गोव्याचे माजी आमदार लहू मामलेदार यांचा आज शनिवारी दुपारी बेळगाव शहरातील खडे बाजार परिसरात खून झाला आहे. एका रिक्षा चालकाने केलेल्या जोरदार हल्ल्यात मामलेदार यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आरोपी रिक्षाचालकाला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार गोव्याचे माजी आमदार लहू मामलेदार हे बेळगाव येथील खाडेबाजार परिसरात असलेल्या श्रीनिवास लॉजमध्ये उतरले होते. आज दुपारी ते आपली कार घेऊन येत असताना एका रिक्षाला कारची धडक बसली. यावरून मामलेदार आणि रिक्षाचालकात वादावादी झाली. यावेळी रिक्षा चालकाने मामलेदार यांच्या कपाळावर जोरदार प्रहार केला. मामलेदार त्या हल्ल्यातून सावरत लॉजकडे निघाले असतानाच रिसेप्शन काउंटर जवळ कोसळले. लॉजच्या मॅनेजरने या घटनेची माहिती मार्केट पोलिसांना दिली. मार्केट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लहू मामलेदार यांना बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता ते मृत असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. याप्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे. या प्रकरणात पुढील चौकशी सुरू आहे.

रिक्षाचालकाला अटक 

रिक्षाला कारचा धक्का लागल्याच्या शुल्लक कराणातून ही घटना समोर आली आहे. कारचा धक्का लागल्यानंतर आरोपी रिक्षा चालक आणि माजी आमदारांमध्ये वाद झाला. त्यानंतर रिक्षाचालकाने माजी आमदार मामलेदार यांच्या कपाळावर जोरदार प्रहार केला. हा प्रहार वर्मी लागल्यानं लॉजमध्ये येताच ते कोसळले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केलं. या प्रकरणात पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली असून, तपास सुरू असल्याचं सांगितलं.