२ कोटींचा विमा पाहून सैतान जागा झाला, त्याने मित्राला दारू पाजून…खुनाचा भयानक कट पाहून पोलीसही हवालदिल!

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात जवळच्या मित्रानेच भयानक कट रचल्याचे समोर आले आहे. नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया...

२ कोटींचा विमा पाहून सैतान जागा झाला, त्याने मित्राला दारू पाजून...खुनाचा भयानक कट पाहून पोलीसही हवालदिल!
क्राईम
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 18, 2026 | 7:40 PM

मैत्रीच्या नावाला काळीमा फासणारी एक भयानक घटना घडली आहे. आपल्या मित्राच्या नावावर 2 कोटी रुपयांच्या विमा पॉलिसीची रक्कम हडपण्यासाठी दोन तरुणांनी त्याच्या हत्येचा कट आखला. या प्रकरणात पोलिसांनी कट्टा साई दीपक आणि कोंडा भानु प्रकाश या दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, आरोपींपैकी एक खासगी बँकेत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो.

मावशीच्या शंकेमुळे उघडकीस आला खरा प्रकार

१४ फेब्रुवारी २०२६ च्या रात्री तेलंगणातील भद्रादी कोठागुडेम जिल्ह्यात मोठे गावाजवळ कट्टा यशवंत नावाचा तरुण रस्त्याच्या कडेला गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात सापडला. सुरुवातीला हा रस्ता अपघात असल्याचे वाटले होते. यशवंतला तात्काळ भद्राचलमच्या शासकीय रुग्णालयात आणि नंतर प्रकृती अधिक बिकट झाल्याने खम्मम येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, यशवंतच्या मावशीने हा अपघात नसून घातपात असल्याची शंका व्यक्त करून पोलिसांत तक्रार दाखल केली. यामुळे तपासाला वेगळे वळण मिळाले.

दारू पाजून केला हल्ला

अपघाताचा बनावट कट रचला पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा झाला. आरोपींनी नोव्हेंबर २०२५ मध्ये यशवंतच्या नावाने २ कोटी रुपयांची विमा पॉलिसी काढली होती. या पॉलिसीमध्ये साई दीपकला नॉमिनी (वारसदार) करण्यात आले होते. नॉमिनी होण्यासाठी दीपकने स्वतःला यशवंतचा नातेवाईक असल्याचे बनावट दाखवले होते.

14 फेब्रुवारीच्या रात्री दोघांनी कटानुसार यशवंतला मोठे गावाजवळ नेले. तेथे त्याला भरपूर दारू पाजली आणि स्कूटरवर बसण्याचा प्रयत्न करत असताना मागून लोखंडी रॉडने डोक्यावर जोरदार वार केला. हा खून नसून अपघात वाटावा म्हणून आरोपींनी यशवंतची दुचाकी रस्त्याखाली फेकली आणि त्याला तेथेच सोडून पळ काढला.

सुदैवाने जीव वाचला; आरोपींनी कबूल केला गुन्हा

सुदैवाने यशवंतचा जीव वाचला आणि तो सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. मंगळवारी (१७ फेब्रुवारी २०२६) सायंकाळी पोलिसांनी दोन्ही आरोपींना कारसह ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्हा कबूल केला असून, विम्याची रक्कम मिळवण्यासाठीच हा कट रचल्याचे सांगितले. सध्या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून, पोलिस अधिक पुरावे गोळा करत आहेत. ही घटना मैत्रीच्या नावाने केलेल्या विश्वासघाताची आणि लोभापोटी केलेल्या क्रूरतेची थेट आठवण करून देते. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.