
अमेरिका आणि भारतामध्ये मोठी व्यापारी डील झाली आहे, या डीलनंतर अमेरिकेकडून असा दावा करण्यात आला होता की, भारताने रशियाकडून तेलाची खरेदी बंद करण्यावर सहमती दर्शवली आहे. मात्र रशियानं अमेरिकेचा हा दावा फेटाळून लावला आहे. याबाबत रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलं आहे, ज्यामध्ये रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं असं म्हटलं आहे की, आमच्याकडे सध्या तरी असं माणण्यास कोणतंही कारण नाही, की भारतानं आमच्याकडून तेलाची खरेदी बंद केली आहे. याउलट रशियानं असं देखील म्हटलं आहे की, भारत आणि रशियामध्ये सुरू असलेला ऊर्जा व्यापार हा दोन्ही देशांसाठी देखील फायद्याचा ठरत आहे. भारत आणि रशियामध्ये सुरू असलेल्या ऊर्जा व्यापारामुळे आंतरराष्ट्रीय स्थरावर ऊर्जा क्षेत्रामध्ये स्थिरता निर्माण झाली आहे.
व्हाईट हाउसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोठा दावा केला होता. त्यांनी आपल्या दाव्यामध्ये असं म्हटलं होतं की, अमेरिकेसोबत बोलणं झाल्यानंतर भारतानं रशियाकडून तेल खरेदी न करण्यास तसेच अमेरिकेकडून कच्च्या तेलाची आयात वाढवण्यास सहमती दर्शवली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं बोलणं झाल्यानंतर भारतानं या संदर्भात सहमती दर्शवल्याचा दावा लेविट यांनी केला होता.
मात्र अमेरिकेच्या या दाव्यानंतर भारताकडून यावर कोणत्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती, दुसरीकडे मात्र अमेरिकेच्या या दाव्यावर रशियानं प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला भारताकडून अद्याप रशियन तेल खरेदी न करण्यासंदर्भात कोणतीही औपचारिक माहिती देण्यात आली नसल्याचं रशियानं म्हटलं आहे, तसेच भारताने आमच्याकडून तेलाची खरेदी बंद केली असं माण्याचं देखील आमच्याकडे कोणतंही कारण नसल्याचं देखील रशियानं यावेळी म्हटलं आहे. दरम्यान रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार जानेवारी महिन्यात भारतानं काही प्रमाणात रशियामधून येणाऱ्या कच्च्या तेलाची आयात कमी केली आहे. मात्र अजून तरी भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी पूर्णपणे थांबवली नाहीये. तर दुसरीकडे अमेरिकेकडून मात्र सहमती दर्शवल्याचा दावा करण्यात येत आहे.