Gen Z protest : मोठी बातमी! भारतातही Gen Z आक्रमक, भाजपाचं कार्यालय जाळलं, सीआरपीएफचं वाहन पेटवलं

लडाखला राज्याचा दर्जा देण्यात यावा तसेच आदिवासीचा देखील दर्जा मिळावा यासाठी लेहमध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे. बुधवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.

Gen Z protest : मोठी बातमी! भारतातही Gen Z आक्रमक, भाजपाचं कार्यालय जाळलं, सीआरपीएफचं वाहन पेटवलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 24, 2025 | 3:06 PM

लडाखला राज्याचा दर्जा देण्यात यावा तसेच आदिवासीचा देखील दर्जा मिळावा यासाठी लेहमध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे. बुधवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पोलीस आणि विद्यार्थी आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं, यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी लेहमधील भाजपच्या कार्यालयाला तसेच सीआरपीएफच्या वाहनाला आग लावली, या घटनेत मोठं नुकसान झालं आहे. आंदोलनानं उग्र रूप घेतल्यानंतर आता गृहमंत्रालयाकडून या आंदोलनाची दखल घेण्यात आली आहे, गृहमंत्रालयानं लडाखच्या नेत्यांसोबत चर्चेला सुरुवात केली आहे.पुढची बैठक आता येत्या 6 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये होणार आहे

हवामान बदलासाठी प्रदीर्घ काळ लढा देणारे सोनम वांगचुक हे गेल्या 15 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत इतर काही जणांनी देखील उपोषण सुरू केलं होतं, मात्र त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लडाखचा समावेश हा सहाव्या अनुसूचीत करावा तसेच राज्याचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या 15 दिवसांपासून लेहमध्ये आंदोलन सुरू आहे. याचदरम्यान दोन महिला आंदोलकांची तब्येत अचानक बिघडली असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या आंदोलनात सहभागी झालेल्या दोन महिलांची तब्येत अचानक बिघडल्यानं आंदोलक अधिक आक्रमक झाले, यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली, त्यानंतर आंदोलकांनी भाजप कार्यालय तसेच सीआरपीएफच्या एका गाडीला आग लावल्याची घटना घडली आहे. तसेच लेह येथील हिल काउन्सील इमारतीवर देखील जोरदार दगडफेक करण्यात आली, दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आयोजकांची काय आहे मागणी

या लढ्याचं नेतृत्व लडाखमधील जनता करत आहे, गृहमंत्रालयाकडून आम्हाला सहा ऑक्टोबरची तारीख देण्यात आली आहे, मात्र आंदोलकांची अशी मागणी आहे की त्यापूर्वीच या प्रश्नावर तोडगा काढण्यात यावा, असं आयोजकांनी म्हटलं आहे. दरम्यान परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहून आता लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे, गृहमंत्रालयाची तेथील नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे.