गोव्यातील नाईट क्लबला आग लागताच बुक केली थायलंडची तिकिट; अखेर लुथरा ब्रदर्सना अटक
गोव्यातील बिर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता. ज्या रात्री ही घटना घडली, त्याच रात्री या क्लबचे सहकारी गौरव आणि सौरभ लुथरा देश सोडून थायलंडला पळून गेले. या दोघांना आता तिथे ताब्यात घेण्यात आलं आहे.

गोव्यातील अर्पोरा इथल्या बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबमध्ये 6 डिसेंबर रोजी भीषण आग लागली होती. या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर क्लबशी संबंधित असलेले गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा देश सोडून पळून गेले होते. त्या दोघांना आता थायलंडमधून अटक करण्यात आली असून त्यांना भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी इंटरपोलने ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. भारत आणि गोवा पोलिसांनी संयुक्तपणे प्रत्यार्पणाची प्रक्रिया वेगवान केली आहे. याप्रकरणी भारताने थाई अधिकाऱ्यांना हद्दपारीची विनंती पाठवली होती. तर गोवा सरकारने परराष्ट्र मंत्रालयाकडे त्यांचे पासपोर्ट रद्द करण्याची विनंतीदेखील केली होती. आगीच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी दोघं देश सोडून गेले होते.
आगीच्या दुर्घटनेप्रकरणी तपास सुरू असताना गोवा पोलिसांना दिसून आलं की 7 डिसेंबर रोजी मध्यरात्री 1.17 वाजता ‘मेक माय ट्रिप’ या अॅपवरून थायलंडला जाणाऱ्या विमानाची तिकिटं बुक करण्यात आली होती. त्यावेळी आपत्कालीन पथकं क्लबमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यात व्यस्त होती. एकीकडे अग्निशमन दल आग विझवण्यासाठी आणि तिथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी धडपडत असताना दुसरीकडे लुथरा बंधू देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत होते. तर लुथरा बंधू फरार नव्हते, ते बिझनेस ट्रिपला गेले होते, अशी बाजू त्यांच्या वकिलांनी मांडली होती. दिल्लीच्या एका न्यायालयाने लुथरा बंधूंना अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला. लुथरा ब्रदर्सच्या वकिलांनी कोर्टात असाही दावा केला की ते दोघं फक्त क्लबचे परवानाधारक होते. क्लबचं दैनंदिन कामका कर्मचारी हाताळत होते.
गोवा पोलिसांनी नाईट क्लबच्या पाच कर्मचाऱ्यांना आणि व्यवस्थापकांना अटक केली आहे. 6 डिसेंबर रोजी मध्यरात्री क्लबला आग लागली होती आणि अवघ्या काही क्षणांतच त्या आगीने संपूर्ण क्लबला वेढलं होतं. याप्रकरणी आठ दिवसांत चौकशी अहवाल तयार होईल. राज्य सरकारने पीडितांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली होती. तसंच सर्व मनोरंजन स्थळांवर सुरक्षेची तपासणी कडक केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
