
पंजाबच्या जालंधरच्या मॉडल टाऊन परिसरातील लोकप्रिय पराठेवाला बीर दविंदर सिंग चांगलाच त्रस्त झाला आहे. बीर दविंदर सिंग याने थेट स्थानिक पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी मला केवळ शिवीगाळ केली नाही तर मारहाणही केलीय. मला रोजच पोलिसांच्या त्रासाचा सामना करावा लागत आहेत, असा दावा बीर दविंदर सिंग याने केला आहे. दविंदर सिंग एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने आपल्या दाव्याचं समर्थन करणारा एक व्हिडीओच सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात पोलिसांसोबत त्याची बाचाबाची सुरू असल्याचं दिसत आहे. दरम्यान, दविंदर सिंग यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडेच तक्रार केली असून न्याय देण्याची मागणी केली आहे.
दविंदर सिंग याने पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांची वाहने दुकानाच्या बाहेर येतात. पोलीस माझ्याशी चुकीच्या पद्धतीने वागतात. पोलीस मला आणि माझ्या कुटुंबीयांना रोजच त्रास देत आहे. माझ्या जीवाला धोका असून मला ठार मारलंही जाऊ शकतं. दिवाळीच्या रात्री तर पोलिसांनी माझ्या 60 वर्षाच्या आईशी हुज्जत घातली आणि शिवीगाळ केली, असा आरोप त्याने केला आहे. या व्हिडीओत दविंदर सिंग पोलिसांशी वाद घालताना दिसत आहे. पोलीस त्याचं काहीही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नसून त्याला दमदाटी करतानाही दिसत आहे. दविंदरच्या दाव्यानुसार, पोलीस रोज येऊन धमकावत आहेत. माझं दुकान बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत.
रात्री उशिरापर्यंत…
वीर दविंदर सिंग याचे दुकान रात्री उशिरापर्यंत उघडे असते. या ठिकाणी लोक त्याच्या हातचे खास हार्ट अटॅक पराठे खायला येतात. दविंदरचे हे पराठे संपूर्ण पंजाबमध्ये फेमस आहेत. त्याचे पराठे खाण्यासाठी लोक दुरून दुरून येतात. त्याच्या पराठ्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याने त्याला हार्ट अटॅक पराठेवाला म्हणूनच ओळखलं जाऊ लागलंय. दरम्यान, दविंदरचं दुकान रात्री उशिरापर्यंत उघडं असतं. ते नियमाच्या विरोधात आहे. पोलीस त्याला रात्री उशिरापर्यंत दुकान सुरू न ठेवण्यास सांगत आहे. पण दविंदर ऐकत नाही. त्यामुळेच पोलीस आणि दविंदर यांच्यात वाद निर्माण झाला आहे, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.
कपिल शर्माही फिदा
प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन कपिल शर्माही हार्ट अटॅक पराठेचा जबरा फॅन आहे. कपिल शर्माने त्याच्या कुटुंबासहीत दविंदर सिंगचे पराठे खाल्ले आहेत. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर दविंदर अधिकच लोकप्रिय झाला होता. त्यानंतर त्याचे ग्राहकही वाढले आहेत. त्यामुळेच त्याला रात्री उशिरापर्यंत पराठ्याचे दुकान सुरु ठेवावं लागत आहे.