
आकाशात उडणारं प्रायव्हेट जेट पाहून कधी तुमच्या मनात असा प्रश्न आला आहे का की प्रायव्हेट जेट हे आपल्यासारख्या सामान्य माणसांना देखील बुक करता येऊ शकतं का? जर खासगी विमान बुक करायचं असेल तर त्यासाठी किती खर्च येतो? आज आपण याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत. एक प्रायव्हेट जेट बुक करायचं असेल तर त्यासाठी सर्वसामान्यपणे किती खर्च येतो, खासगी विमान कसं बुक करायंच? असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. सर्व प्रथम या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेच आहे की, प्रायव्हेट विमान हे कोणीही बुक करू शकतं. त्यासाठी कोणासोबत काही खास ओळख असण्याची गरज नाही, किंवा तुम्हाला जर प्रायव्हेट विमान बुक करायचं असेल तर त्यासाठी कोणत्याही सरकारी विभागाच्या परवानगीची देखील आवश्यकता नसते, फक्त त्यासाठी तुमचा खिसा गरम असणं गरजेचं आहे, म्हणजे खिशात पुरेसे पैसे असणं गरजेचं आहे.
भारतात अनेक चार्टर्ड एविएशन कंपन्या आहेत, ज्या तुमच्या गरजेनुसार तुम्हाला सेवा पुरवण्याचं काम करतात, ज्या तुमच्या गरजेनुसार तुम्हाला हेलिकॉप्टर किंवा छोटे चार्टर्ड प्लेन भाड्यानं देतात. भारतामध्ये प्रायव्हेट प्लेनचं भाडं हे प्रति तासावर अवलंबून असतं. तुम्ही किती तास प्रवास केला, त्यावर त्याचा दर अवलंबून असतो. छोट्या आणि वजनाने हलक्या असलेल्या चार्टर्ड प्लेनचा तासाचा चार्ज दीड लाख ते दोन लाख इतका असतो. तर मध्यम स्वरुपाच्या चार्टर्ड प्लेनचं भाडं हे तासाला 4 ते 6 लाख रुपये इतकं असतं. जर तुम्ही मोठं आणि सर्व सुविधा असलेलं चार्टर्ड प्लॅन बुक करू इच्छित असाल तर या प्लेनचं भाडं प्रति तास आठ लाख रुपयांपर्यंत असू शकतं.
याचा अर्थ स्पष्ट आहे की, जर तुम्हाला प्रायव्हेट जेटने दोन ते तीन तासांचा प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 10 ते 20 लाख रुपये मोजण्याची तयारी ठेवावी लागेल. एवढे पैसे म्हणजे एखाद्या मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यभराची कमाई असते, त्यामुळे सर्व सामान्यपणे अशा प्रकारची विमानं हे श्रीमंत उद्योगपतीच भाड्यानं घेतात. जर तुम्हाला विमान खरेदी करायचं असेल तर छोट्या प्रायव्हेट प्लेनची किंमत ही 15 कोटी ते 35 कोटीपर्यंत आहे.