
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाने कोणताही पुरस्कार स्वीकारणार नाही. तसेच अशा प्रकारच्या कोणत्याही कार्यक्रमात मी सहभागी होणार नाही असं विधान केले आहे. काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्याने खासदारांना विचारवंताच्या नावाने पुरस्कार स्वीकारू नये असे आवाहन केले होते त्यामुळे थरून यांनी सावरकरांच्या नावाने पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे.
केरळमधील तिरुवनंतपुरमचे खासदार थरूर यांना ‘वीर सावरकर सन्मान’ पुरस्कार जाहीर झाला होता. मात्रा आता तो स्वीकारणार नसल्याची माहिती थरूर यांनी दिली आहे. तसेच या पुरस्कार सोहळ्यालाही उपस्थित राहणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या पुरस्काराचे स्वरूप किंवा तो प्रदान करणाऱ्या संस्थेबद्दल मला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. माझ्या संमतीशिवाय माझे नाव जाहीर करून आयोजक बेजबाबदारपणे वागले आहे असंही थरूर यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस नेते के. मुरलीधरन यांनी म्हटले होते की, शशी थरूर किंवा काँग्रेसच्या कोणत्याही सदस्याने वीर सावरकरांच्या नावावर असलेला कोणताही सन्मान स्वीकारू नये कारण ते ब्रिटिशांना शरण गेले होते. त्यामुळे असा पुरस्कार स्वीकारल्यास काँग्रेस पक्षाची बदनामी होईल. मुरलीधरन यांच्या या विधानानंतर, शशी थरूर यांनी, ‘मी हा सन्मान स्वीकारणार नाही आणि कार्यक्रमालाही उपस्थित राहणार नाही’ अशी माहिती दिली होती.
यानंतर थरूर यांनी सोशल मीडियावरही याबाबत एक पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, ‘या पुरस्काराचे स्वरूप, तो प्रदान करणारी संस्था किंवा इतर कोणताही संदर्भ मला माहिती नाही. त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा किंवा सन्मान स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’
शशी थरूर यांच्या या विधानानंतर, पुरस्कार देणाऱ्या हाय रेंज रुरल डेव्हलपमेंट सोसायटी (HRDS) इंडियाचे सचिव अजी कृष्णन यांनी म्हटले की, ‘आम्ही थरूर यांनी या पुरस्काराबद्दल माहिती दिली होती. आमचे प्रतिनिधी आणि पुरस्कार ज्युरीचे अध्यक्ष यांनी शशी थरूर यांची त्यांच्या घरी भेट घेतली होती आणि कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. त्यावेळी थरूर यांनी इतर पुरस्कारार्थींची यादी देखील मागितली होती. आम्ही ती यादी दिली होती, मात्र त्यांनी कार्यक्रमाला हजर राहणार की नाही हे सांगितले नव्हते. कदाचित काँग्रेस हा मुद्दा बनवत आहे, त्यामुळे ते घाबरले असतील.’