
“दहशतवादाविरोधात भारताची प्रतिज्ञा किती कठोर आहे, ते सगळ्या जगाने पाहिलं. आम्ही त्यांच्या न्यूक्लियर ब्लॅकमेलची पर्वा केली नाही. पाकिस्तानने अनेकदा अणवस्त्र वापरण्याच्या धमक्या दिल्या. आज मी श्रीनगरच्या भूमीवरुन सगळ्या जगाला प्रश्न विचारतो, अशा बेजबाबदार, चुकीच्या देशाच्या हातात अणवस्त्र सुरक्षित आहेत का?. पाकिस्तानची अणवस्त्र IAEA च्या आपल्या देखरेखीखाली घ्यावी” अशी मोठी मागणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली. ते जम्मू-काश्मीरमध्ये बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी सैन्यदलांना धूळ चारणाऱ्या भारतीय जवानांच त्यांनी भरभरुन कौतुक केलं. आमचं सैन्य मातृभूमीच्या रक्षणासाठी न थांबता काम करतय हे अद्वितीय आहे असं राजनाथ सिंह म्हणाले.
“पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन निरपराधांना मारलं. तुम्ही जे उत्तर दिलं, ते जगाने बघितलं. भारतीयांना तुम्ही धर्म विचारुन मारलत, तर आम्ही तुम्हाला तुमचं कर्म पाहून मारलं. त्यांनी धर्म पाहून निरपराधांचा बळी घेतला. आम्ही पाकिस्तानच कर्म पाहून त्यांचा खात्मा केला. हा आमचा भारतीय धर्म आहे” असं राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितलं.
भारत IMF ला पैसा देतो
“एक संरक्षण मंत्री म्हणून मला तुम्हाला खूप जवळून समजण्याची संधी मिळाली. पहलगामच्या घटनेनंतर तुमच्या मनात राग होता. संपूर्ण देशात क्रोध होता. तुम्ही तुमच्या रागाला योग्य दिशा देऊन पहलगामचा बदला घेतलात” असं राजनाथ सिंह म्हणाले. “पाकिस्तान आज अशा स्थितीत आहे, ते जिथे उभे राहतात, तिथून मागणाऱ्यांची लाईन सुरु होते. आज ते IMF कडून कर्ज घेत आहेत, आज भारत त्या देशांच्या श्रेणीमध्ये येतो, जे IMF ला पैसा देतात, जेणेकरुन गरीब देशांना कर्ज मिळेल. भारताबद्दल सगळ्यांना माहित आहे. भारत शांततेला प्राधान्य देणारा देश आहे. पण जेव्हा देशाच्या संप्रभुतेवर आक्रमण होतं, तेव्हा उत्तर देणं गरजेच आहे” असं राजनाथ सिंह म्हणाले.