जर युद्ध झालं तर पाकिस्तान भारतासमोर किती दिवस तग धरणार? पाकच्या संरक्षण तज्ज्ञानं सांगितली आतली गोष्ट
पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे, या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे.

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे, या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे, भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत, भारतानं सिंधू नदी कराराला स्थगिती दिली आहे. अटारी बॉडर देखील बंद करण्यात आली आहे, तसेच पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आल्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे, पाकिस्तानच्या पंतप्रधानांपासून ते लष्कर प्रमुखांपर्यंत युद्धाच्या पोकळ धमक्या देण्यात येत आहेत. यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. सीमेवर हालचाली वाढल्या आहेत. जर समजा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं तर पाकिस्तान भारतासमोर किती दिवस टिकू शकतं? तज्ज्ञ काय म्हणतात याबाबत जाणून घेऊयात.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ कमर चिमा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पाकिस्ताननं भारतासाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. यामागे पाकचा असा उद्देश आहे की, भारताच्या कोणत्याच विमानाला पाकिस्तानी हवाई हद्दीत प्रवेश द्यायाचा नाही, मात्र तशी स्थिती निर्माण झाल्यास परिस्थिती आणखी चिघळू शकते. भारताकडून आयएनएस विक्रांतला समुद्रात तैनात करण्यात आलं आहे. भारताच्या एअरफोर्सने युद्ध अभ्यास सुरू केला आहे. या सर्व गोष्टीवर पाकिस्तान नजर ठेवून आहे, असं चिमा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, भारताकडून देखील हालचाली वाढल्या आहेत, सैन्यांच्या हालचाली आणि त्या संबंधित रिपोर्टिग करू नका, असे आदेश भारत सरकारने तेथील वृत्तवाहिन्यांना दिले आहेत. याचाच अर्थ असा आहे की हे प्रकरण गंभीर आहे.भारत सीमेवर सैन्याची संख्या वाढवत आहे. या परिस्थितीमध्ये भारत आणि पाकिस्तान युद्ध झालं तर पाकिस्तान भारतासमोर फार काळ दम धरू शकणार नाही, कारण सध्या आमच्या देशाकडे शस्त्र आणि पैसा पुरेशा प्रमाणात नाहीये, त्यामुळे हे युद्ध दीर्घकाळ चालले असं मला वाटत नाही. भारताला सुद्धा पाकिस्तानची परिस्थिती कशी आहे, हे चांगलंच माहिती आहे, असं चिमा यांनी म्हटलं आहे.
