नद्या-नाल्यांना पूर येणार, 10 राज्यांना अतिवृष्टीचा इशारा; IMD कडून रेड अलर्ट

IMD Rain Red Alert : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील 4 ते 5 दिवस मध्य भारतात मान्सून पूर्णपणे सक्रिय राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह 10 राज्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नद्या-नाल्यांना पूर येणार, 10 राज्यांना अतिवृष्टीचा इशारा; IMD कडून रेड अलर्ट
IMD Rain Red Alert for 10 states
Image Credit source: Google
| Updated on: Jul 03, 2026 | 6:36 PM

जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यानंतर आता जुलैमध्ये मात्र पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. भारतीय हवामान विभागाने उद्याच्या हवामानाबाबत गंभीर इशारा जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील 4 ते 5 दिवस मध्य भारतात मान्सून पूर्णपणे सक्रिय राहणार आहे. उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, सौराष्ट्र, कच्छ, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओडिशा या भागात अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाच्या कोणत्या भागात कसे हवामान असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दिल्ली आणि एनसीआर

मान्सूनच्या आगमनानंतर दिल्लीत उद्या ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. उद्या मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमीपर्यंत राहू शकतो.

मध्य प्रदेश

पश्चिम मध्य प्रदेशात अतिवृष्टीचा रेड/ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागांत ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. भोपाळ आणि इंदूरमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

राजस्थान

पूर्व राजस्थानात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम राजस्थानात धुळीचे वादळ आणि ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

हरियाणा-पंजाब

हरियाणातील आणखी काही भागांत मान्सून दाखल झाला आहे. उद्या राज्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये मान्सून सक्रिय होत असून अनेक जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गुजरात

दक्षिण गुजरातमध्ये अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सौराष्ट्र आणि कच्छमध्येही खराब हवामान राहणार असून जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

ओडिशा

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओडिशात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटाचाही धोका आहे.

महाराष्ट्र

कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पुढील काही दिवस अतिवृष्टी सुरू राहण्याचा अंदाज आहे. मुंबई आणि आसपासच्या भागांत वादळी वारे आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर नाशिकमध्ये मध्यम ते जोरदार आणि नागपूरमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश-पश्चिम बंगाल

पश्चिम उत्तर प्रदेशात हलका पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. पूर्व उत्तर प्रदेशात तुलनेने कोरडे हवामान राहून उकाडा जाणवू शकतो. गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगाल आणि उप-हिमालयीन भागांत मान्सून पूर्णपणे सक्रिय आहे. अनेक भागांत जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

Follow Us