
पुढील ट्रेन येण्यासाठी अजून वेळ होता. त्यातच अगोदरच्या रेल्वे प्रवासाने तिला झोप येत होती. तिचा अचानक डोळा लागला. पण या एका डुलकीने तिच्या आयुष्यात भूकंप आणला. अडीच वर्षांचा मुलाला कवटाळून ती झोपली होती. पण डोळा उघडताच तिचा काळजाचा तुकडा दिसला नाही. तिने आजूबाजूला पाहिले. त्याला हाका दिल्या. सगळीकडे शोधले. आपल्या झोपेची तिला कोण राग आला. ती ओक्सा बोक्सी रडू लागली. तिच्या आपबित्तीने पोलीस दल ही हादरलं.
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरील या घटनेने पोलीस दल हादरले. ही महिला स्टेशनवर पुढील ट्रेनची वाट पाहत असताना तिचा डोळा लागला. त्याचवेळी कोणीतरी तिचे मूल झोपेतच उचलून नेले. तिची अवस्था पाहून पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. सर्वात अगोदर त्यांनी सीसीटीव्ही तपासले. त्यांचा अंदाज खरा ठरला. एक महिला मुलाला उचलून घेऊन जाताना दिसली. पण पुढे अडचणींचा मोठा डोंगर होता. ही महिला एका ऑटोतून निघून गेली. रेल्वे पोलिसांसमोर तिला पकडण्याच मोठे आव्हान उभं ठाकलं. त्या महिलेला त्यांनी मुलगा परत आणण्याचे आश्वासन तर दिलं पण इतक्या मोठ्या दिल्लीत त्या महिलेला शोधणार तरी कसं असा मोठा सवाल पोलिसांसमोर आ वासून उभा ठाकला.
अन् क्लू मिळाला
गेल्यावर्षी 16/17 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती. महिलेची रडून रडून वाईट अवस्था झाली होती. तिचा मुलगा चोरीला गेला होता. तर सीसीटीव्ही आधारे हा मुलगा एका महिलेने उचलून नेल्याचे, त्याचे अपहरण केल्याचे समोर आले होते. एका ऑटोतून ही महिला पुढे गेल्याचेही समोर आले होते. मग रेल्वे पोलिसांनी स्टेशन बाहेरील काही सीसीटीव्ही तपासले. त्यात ही रिक्षा आणि तिचा नंबर स्पष्टपणे दिसला. पोलिसांनी त्या रिक्षा चालकाला गाठले. त्याने त्या महिलेला बदरपुर-फरीदाबाद परिसरातील एका टोल नाक्याजवळ सोडल्याचे सांगितले.
महिलेने दिले पोलिसांना आव्हान
हे प्रकरण समोर येताच मागील दोन प्रकरणाची पण त्यात भर पडली. त्यापूर्वी 31 जुलै 2023 रोजी तिकीट काऊंटर हॉलमधून तीन वर्षाच्या मुलाचे सुद्धा असेच अपहरण करण्यात आल्याचे समोर आले. तर या वर्षी 21 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली रेल्वे स्टेशन फूड कोर्ट वेटिंग हॉल येथून अवघ्या चार महिन्यांचे बाळ चोरीला गेल्याचे पण तपासादरम्यान समोर आले. सीसीटीव्हीत तीच महिला समोर आली.
या महिलेने रेल्वे पोलिसांना जणू एक चँलेजच दिले होते. बाळ चोरल्यावर ती ऑटो रिक्षातून बदरपुर-फरीदाबाद परिसरातील एका टोल नाक्याजवळ उतरत असल्याचे आतापर्यंतच्या तीनही केसमध्ये समोर आले. मग पोलिसांनी तपासाची गती वाढवली.
अन् पती-पत्नीला अटक, दोन मुलं ताब्यात
पोलिसांना थेट आव्हान देणारी ही महिला चर्चेचा विषय ठरली. माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले. मग एक खास पथक तयार करण्यात आले. त्यात वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची मोठ्या टीमने शोध मोहिम राबवली. या टीमने जवळपास 700 सीसीटीव्ही तपासले. त्या परिसरातील मोबाईल डेटा, दूरसंचार टॉवरवरील संभाषण, डेटा शोधला. त्याआधारे या महिलेचा पत्ता शोधण्यात यश आले. मोठ्या कसरतीनंतर पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी चोरीला गेलेली दोन मुलं त्यांनी ताब्यात घेतली. त्या महिलेसह तिच्या पतीला अटक केली. एका मुलाचा शोध लवकरच लागणार असल्याचे समोर आल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला.