
बिहारच्या किशनगंज येथे अंधश्रद्धेचे अजब प्रकरण उघडकीस आले आहे. एका युवकाने आपल्या तांत्रिक विद्येसाठी गुरुचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह कबरीतून काढून त्याचे शीर धडापासून वेगळे केले. त्यानंतर त्याने तांत्रिक विद्येसाठी हे शीर स्वत:सोबत नेले. यावेळी झोळीत शीर घेऊन जाताना गावकऱ्यांनी या तरुणाला पाहिले आणि पकडले. त्यानंतर लोकांनी त्याला मारहाण केली आणि पोलिसांच्या हवाली केले. घटनेनंतर संपूर्ण भागात दहशत पसरली आहे.
किशनगंज टाऊन पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात महीन गाव पंचायती अंतर्गत मडुआ टोली गावातील हे प्रकरण आहे. या तरुणाला झोळीतून शीर घेऊन जाताना गावकऱ्यांनी पाहिले तर त्यांना धक्काच बसला. मिळालेल्या माहितीनुसार ब्रिजेन राय उर्फ अलगू बाबा तांत्रिक क्रिया करायचा. अनेक लोक तांत्रिकक्रिया करण्यासाठी त्याच्याकडे यायचे. या दरम्यान २५ वर्षीय युवक श्री प्रसाद देखील त्याच्याकडे तांत्रिकक्रिया शिकण्यासाठी यायचा.
तांत्रिक अगलू बाबा याचा १५ दिवसांपूर्वी प.बंगालच्या लाहिल येथे मृत्यू झाला होता. यानंतर त्याला कबरीतून दफन करण्यात आले होते. आपल्या गुरुच्या मृत्यूची बातमी ऐकून श्री प्रसाद बंगाल गेला आणि त्याने त्याच्या बाबाच्या कबरीची रेकी केली. वेळ मिळताच रात्री जाऊन त्याने कबरीतून मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाचे शीर धारदार हत्याराने कापून आपल्या सोबत किशनगंजला घेऊन आला.
इकडे सकाळी गावातील लोकांनी पाहिले की अलगू बाबाची कबर कोणीतरी खोदली आहे आणि शीर धडापासून वेगळे करुन गायब केले आहे. या घटनास्थळापासून ७ किमी दूरवर बिहारच्या किशनगंजमध्ये गाववाल्यांनी श्री प्रसाद याला सकाळी झोळीतून मुंडके घेऊन जाताना पाहिले. त्यानंतर गावातील लोकांनी त्यासंदर्भात विचारणा केली. ही बातमी आगीसारखी पसरली आणि गावकरी जमले.
त्यानंतर एका स्थानिक युवकाने सांगितले की श्री प्रसाद तंत्र मंत्र करतो. आणि त्याच्या गुरुला तंत्रमंत्र विद्या येत होतो. त्याच्या मेंदूत खूप ज्ञान होते. यासाठी तंत्रमंत्र करण्याच्या उद्देश्याने कबरीतून त्याने शीर काढून आणल्याचे सांगितले.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी या तरुणाला ताब्यात घेतले. युवकाने तांत्रिकाचे शीर बांबूच्या झाडीत लपवले होते, ते शीर नंतर पोलिसांना ताब्यात घेतले. पोलीस अधिक्षक सागर कुमार यांनी सांगितले की ही घटना प. बंगालची आहे. चौकशीनंतर आरोपीला बंगाल पोलिसांच्या हवाली केले आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे. घटनेनंतर गावात घबराट पसरली आहे.