पाकिस्ताननं पाकव्याप्त काश्मीर खाली करावं, भारतानं पुन्हा ठणकावलं

भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला ठणकावलं आहे, पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीर खाली करावाच लागेल असं भारतानं म्हटलं आहे.

पाकिस्ताननं पाकव्याप्त काश्मीर खाली करावं, भारतानं पुन्हा ठणकावलं
Image Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
| Updated on: May 13, 2025 | 7:48 PM

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले, या हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं. पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले, तसेच भारताच्या या कारवाईमध्ये 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले, ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला होता, अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तानकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली, मात्र त्यानंतर अमेरिकेकडून काश्मीरच्या प्रश्नावर देखील भाष्य करण्यात आलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर आज भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली.

या पत्रकार परिषदेमधून अमेरिकेला इशारा देण्यात आला आहे, तसेच पाकिस्तानला देखील ठणकावण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरबाबतचे प्रश्न हे द्विपक्षीय पद्धतीनेच सोडवले जाणार, कुणाचीही मध्यस्थी आम्हाला मान्य नाही असं भारतानं आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे. तसंच पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीर खाली करावंच लागणार असंही भारतानं  म्हटलं आहे.

भारत आणि पाकिस्तानकडून युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर अमेरिकेकडून काश्मीरच्या प्रश्नावर देखील भाष्य करण्यात आलं होतं. त्यानंतर आज परराष्ट्र मंत्रालयाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये भारतानं पुन्हा एकदा काश्मीरबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर इतरांची मध्यस्थी मान्य नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींमध्ये चर्चा झाली आहे. जम्मू काश्मीरमधील प्रश्न द्विपक्षीय चर्चेनं सोडवले जातील, पाकिस्तानने पीओके खाली करावं, असं भारतानं म्हटलं आहे.

दरम्यान युद्धविरामानंतर अमेरिकेकडून भारत आणि पाकिस्तानसोबतच्या व्यापारावर देखील भाष्य करण्यात आलं होतं. यावर देखील भारतानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारत आणि अमेरिकेच्या चर्चेमध्ये व्यापाराचा मुद्दा नव्हता, युद्धविरामामध्ये कुठेही व्यापाराचा मुद्दा नव्हता असं भारताच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. पाकच्या गोळीचं उत्तर गोळीनंच देऊ, असा इशाराही यावेळी भारताकडून पुन्हा एकदा पाकिस्तानला देण्यात आला आहे.