Jyoti Malhotra : ज्योती तर फक्त ट्रेलर… 3 दिवसात पकडले 11 पाकिस्तानी हेर; एकेकाची कुंडली वाचा?

हरियाणाच्या ज्योती मल्होत्राच्या पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणाचा तपासात पोलिसांनी गेल्या तीन दिवसांत 11 लोकांना अटक केली आहे. यात ज्योती मल्होत्रा, देवेंद्र सिंह, अरमान आदींचा समावेश आहे. हेरगिरी जाळ्यात सापडलेल्यांना पाकिस्तानी एजंटांकडून पैसे आणि व्हिसाची सुविधा मिळत होती. अटके झालेल्यांमध्ये युट्यूबर, विद्यार्थी आणि सेक्युरिटी गार्डसारखे विविध लोक आहेत.

Jyoti Malhotra : ज्योती तर फक्त ट्रेलर... 3 दिवसात पकडले 11 पाकिस्तानी हेर; एकेकाची कुंडली वाचा?
3 दिवसात पकडले 11 पाकिस्तानी हेर
| Updated on: May 20, 2025 | 1:15 PM

हरियाणाची ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अटक केल्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाची पाळंमुळं खोदून काढायला सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या तीन दिवसात आतापर्यंत 11 लोकांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई आहे. हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातून हे अटक सत्र करण्यात आलं आहे. या लोकांना पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्यासाठी जाळं पसरण्यात आलं होतं. या जाळ्यात हे लोक फसले. 20 ते 30 वयोगटातील हे तरुण आहेत. यात ज्योती मल्होत्रा, देवेंद्र सिंह, अरमान यांच्यासह 11 लोक सामील आहेत. या पैकी काही लोकांवर टाकलेला हा प्रकाश.

ज्योती मल्होत्रा

ज्योती मल्होत्रा ही युट्यूबर आहे. हरियाणाच्या हिसारमधील राहणारी आहे. ज्योतीला हरियाणातून अटक करण्यात आली आहे. तिच्या चॅनलवर 3.85 लाख सब्सक्राईबर आहेत. ज्योतीने 2023, 2024 आणि मार्च 2025मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. ती पाकिस्तानी उच्चआयोगातील एक कर्मचारी एहसान उर रहीम ऊर्फ दानिश याच्या संपर्कात होती. पोलिसांच्या माहितीनुसार, ज्योतीला हेर म्हणून तयार केलं जात होतं. तिच्याकडे सुरक्षेशी संबंधित थेट माहिती नव्हती.

गजाला आणि यामीन मोहम्मद

पंजाबच्या मलेरकोटला येथून गजाला आणि यामीन यांना अटक करण्यात आलं आहे. हे लोक दानिशच्या माध्यमातून पैसा आणि व्हिसाची सुविधा घेत होती. त्यांना पाकिस्तानी एजंटची माहिती देणे आणि पैसे पाठवण्याचे काम सोपवण्यात आले होते.

देवेंद्र सिंह

पंजाबच्या खालसा कॉलेजचा 25 वर्षाचा युवक हरियाणाच्या कॅथलमधून पकडला गेला. त्याने पटियाला सैन्य छावणीचे फोटो पाकिस्तानी एजंट्सला पाठवली होती. त्याने फेसबुकवर बंदूक आणि पिस्तूलचे फोटो फेसबुकवर टाकले होते. त्याने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानचा प्रवास केला होता.

अरमान

अरमान नूंह हा 26 वर्षाचा तरुण आहे. त्याला ज्योतीसोबत अटक करण्यात आली आहे. त्याने भारतीय सैन्याची माहिती व्हॉट्सएपद्वारे पाकिस्तानी सैन्याला पाठवली. त्याच्या फोनमध्ये अनेक फोटो आणि व्हिडीओ सापडले.

नौमान इलाही

अवघ्या 24 वर्षाचा नौमान इलाही हा उत्तर प्रदेशातील राहणारा आहे. तो हरियाणाच्या पानीपतमध्ये सेक्युरिटी गार्ड होता. त्याला आयएसआयशी संबंधित एजंटला माहिती पुरवल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. तो सुद्धा अनेकदा पाकिस्तानात जाऊन आला आहे.

मोहम्मद मुर्तजा अली

मोहम्मद मुर्तजा अलीला पंजाबच्या जालंधरमधून अटक करण्यात आली आहे. त्याने हेरगिरी करण्यासाठी एक खास मोबाइल अॅप बनवलं होतं. त्याच्याकडे चार फोन होते आणि तीन सीम कार्ड मिळाले आहेत.

शहजाद

शहजाद हा उत्तर प्रदेशच्या रामपूरचा राहणारा आहे. त्याला मुरादाबादमध्ये अटक करण्यात आली आहे. तो बेकायदेशीर व्यापाराच्या बहाण्याने हेरगिरी करत होता. तसेच आयएसआयला गोपनीय माहिती द्यायचा.

सुखप्रीत सिंग आणि करनबीर सिंग

सुखप्रीत सिंग आणि करणबीर सिंग या दोघांना पंजाबच्या गुरुदासपूरमधून अटक करण्यात आली आहे. हे दोघेही ऑपरेशन सिंदूरची माहिती आयएसआयला देत होते. त्यासाठी त्यांना एक लाख रुपये देण्यात आले होते. अंमली पदार्थाच्या तस्करीतही ते सामील होते.