
दित्वा चक्रीवादळामुळे श्रीलंकेला मोठा फटका बसला आहे. यामुळे श्रीलंकेचे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारताने तातडीने श्रीलंकेला मदतीचा हात पुढे केला आहे. ऑपरेशन सागर बंधु (Operation Sagar Bandhu) अंतर्गत २८ नोव्हेंबरपासून हवाई आणि सागरी मार्गाने आतापर्यंत ५३ टन मदतीचे साहित्य श्रीलंकेला पोहोचवण्यात आली आहे. तसेच या संकटात अडकलेल्या १५०० हून अधिक भारतीय नागरिकांनाही सुरक्षितपणे मायदेशी आणण्यात आले आहे.
भारताने आधी शेजारी या धोरणातंर्गत आणि व्हिजन महासागरच्या मार्गदर्शनाखाली २८ नोव्हेंबर रोजी हे व्यापक शोध, बचाव आणि मदत अभियान सुरू केले. यात भारतीय नौदलाची जहाजे आयएनएस विक्रांत, आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस सुकन्या यांच्याद्वारे मदत पोहोचवण्यात आली. तसेच भारतीय वायुसेनेच्या ट्रान्सपोर्ट विमानेही मदत घेऊन कोलंबो आणि त्रिनकोमाली येथे पोहोचली. या मदतीमध्ये ९.५ टन आपत्कालीन रेशन, तंबू, ब्लँकेट, स्वच्छता किट, तयार खाद्यपदार्थ , औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांचा समावेश आहे.
तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची ८० जणांची विशेष टीम तसेच ५ व्यक्तींचे वैद्यकीय पथक देखील श्रीलंकेत तैनात करण्यात आले आहे. त्यासोबतच आयएनएस विक्रांतचे चेतक हेलिकॉप्टर्स आणि भारतीय वायुसेनेचे एमआय-१७ हेलिकॉप्टर्स श्रीलंकेच्या वायुसेनेसोबत मिळून मोठ्या प्रमाणावर बचाव अभियान राबवत आहेत. यात अनेक गर्भवती महिला, बालके आणि गंभीर जखमींसह अडकलेल्या लोकांना हवाई मार्गाने बाहेर काढले जात आहे.
या बचावलेल्या लोकांमध्ये श्रीलंका आणि भारताव्यतिरिक्त जर्मनी, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, पोलंड, पाकिस्तान आणि बांगलादेशसह अनेक देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. एनडीआरएफची पथके पूरग्रस्त भागांमध्ये शोध आणि बचाव कार्य करत आहे. त्यासोबतच स्थानिक कुटुंबांना मदतही दिली जात आहे. भारत आणि श्रीलंकेने केलेल्या या संयुक्त अभियानात आतापर्यंत १२१ हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे. तसेच चक्रीवादळामुळे अडकलेल्या अंदाजे १५०० हून अधिक भारतीय नागरिकांना भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानांनी आणि व्यावसायिक विमानांनी सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यात आले.
भारत या कठीण काळात श्रीलंकेचे सरकार आणि जनतेसोबत एकजुटीने उभे राहत असल्याने सर्व स्तरावरुन भारताचे कौतुक केले जात आहे. तसेच भारताकडून मिळालेल्या मदतीला पूर्ण पाठिंबा देऊ, असे श्रीलंकेने सांगितले आहे.