PM Modi: भारत दूरसंचार क्षेत्रात जागतिक उत्पादन केंद्र बनत आहे, PM मोदींचे BSNL च्या 4G नेटवर्कच्या उद्घाटनप्रसंगी विधान

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान वापरण्यात आलेल्या बीएसएनएलच्या 4जी स्टॅक आणि 97500 बीएसएनएल नेटवर्कचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

PM Modi: भारत दूरसंचार क्षेत्रात जागतिक उत्पादन केंद्र बनत आहे, PM मोदींचे BSNL च्या 4G नेटवर्कच्या उद्घाटनप्रसंगी विधान
PM Modi BSNL
| Updated on: Sep 27, 2025 | 9:44 PM

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान वापरण्यात आलेल्या बीएसएनएलच्या 4जी स्टॅक आणि 97500 बीएसएनएल नेटवर्कचे उद्घाटन केले. ओडिशातील झारसुगुडा येथून या मोबाइल नेटवर्कचे उद्घाटन पार पडले. हे स्वदेशी तंत्रज्ञान 37000 कोटी रुपये वापरून तयार करण्यात आले आहे. बीएसएनएल 4जी लाँच करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की “पूर्वी 2जी आणि 3जी बद्दल मीम्स बनवले जात होते, मात्र कठोर परिश्रमानंतर बीएसएनएलने इतिहास रचला आहे. मी याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत संचार निगम लिमिटेडच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त या स्वदेशी नेटवर्कचे उद्घाटन केले. या उद्घाटनानंतर भारत आता स्वदेशी नेटवर्क असणाऱ्या डेन्मार्क, दक्षिण कोरिया, चीन आणि स्वीडन या देशांच्या यादीत सामील झाला आहे. हे नेटवर्क क्लाउड-आधारित आहे, कालांतराने ते 5जी मध्ये अपग्रेड केले जाणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी म्हटले की, ‘भारत दूरसंचार क्षेत्रात जागतिक उत्पादन केंद्र बनत आहे.’

भारताचा आत्मविश्वास वाढवणारा उपक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची पोस्ट शेअर करताना म्हटले की, बीएसएनएलचा 4जी उपक्रम स्वदेशीच्या भावनेला उजाळा देत आहे. 92000 साइट्सनी 2.2 कोटी लोकांना एकत्र जोडले आहे. हे भारताचा आत्मविश्वास, रोजगार, निर्यात, आर्थिक वाढ आणि स्वावलंबनाकडे जाण्याच्या प्रवासाचे प्रतिबिंब आहे.

ओडिशा डबल इंजिन वेगाने पुढे जात आहे

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, ‘दीड वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीदरम्यान ओडिशाच्या लोकांनी ‘विकसित ओडिशा’ या एका नवीन संकल्पाने पुढे जाण्याचे वचन दिले होते. आज ओडिशा डबल इंजिन वेगाने पुढे जात आहे. आता पुन्हा ओडिशा आणि देशाच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांवर काम सुरू आहे. आजपासून बीएसएनएलचा एक नवीन अवतार देखील उदयास आला आहे. बीएसएनएलचे नेटवर्क दुर्गम आणि सीमावर्ती भागांना कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.’

ओडिशात 2 सेमीकंडक्टर युनिट्स तयार होणार

पंतप्रधान मोदी यांनी पुढे बोलताना म्हटले की, “ओडिशाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. या राज्याने अनेक दशकांपासून त्रास सहन केला आहे; मात्र आताचे दशक हे ओडिशाला पुढे जाण्याची संधी देत आहे. केंद्र सरकारने अलीकडेच ओडिशासाठी दोन सेमीकंडक्टर युनिट्सना मंजुरी दिली आहे. आगामी काळात ओडिशात एक सेमीकंडक्टर पार्क देखील स्थापन केला जाणार आहे.’