
काही महिन्यांपूर्वी अमेरिकेने भारतासह अनेक देशांवर कर लादला होता. भारतावर एकूण 50 टक्के कर लादला होता. त्यामुळे काही उत्पादनांच्या निर्यातीवर परिणाम झाला होता. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर भारताने उत्तर शोधले आहे. भारताने आपली निर्यात वाढवण्यासाठी मुक्त व्यापार करार (FTA) प्रक्रियेला वेग दिला आहे. अमेरिकेच्या निर्णयाचा परिणाम कमी करण्यासाठी आणि भारतीय मालाला नवीन बाजारपेठा निर्माण करण्यासाठी भारत आगामी काळात अनेक देशांसोबत नवीन व्यापार करार करणार आहे, याबाबतच्या तयारीला वेग आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने कर लादल्यानंतर भारत आता आपल्या मालाला खरेदीदार शोधत आहे. भारत सध्या युरोपियन युनियन, न्यूझीलंड आणि चिली सारख्या देशांसोबत करार करण्याच्या तयारीत आहे. याच आठवड्यात ओमानसोबत FTA करार अंतिम होण्याची शक्यता आहे. ओमानची राजधानी मस्कत येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे, यावेळी दोन्ही देशांमध्ये करार होण्याची शक्यता आहे.
भारत आणि ओमान यांच्यातील कराराचा उद्देश दोन्ही देशांमधील व्यापार वाढवणे हा आहे. हा करार झाल्यानंतर अभियांत्रिकी वस्तू, वस्त्रोद्योग, औषधनिर्माण आणि कृषी उत्पादनांच्या निर्यातीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भारतासाठी FTA आर्थिक धोरणाचा एक महत्त्वाचा भाग बनत आहेत. अशा प्रकारच्या करारांमुळे भारताचे जागतिक पुरवठा साखळीत स्थान मजबूत होण्यास, निर्यात वाढण्यास आणि रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे.
अमेरिकेने ऑगस्टमध्ये भारतावर 50% आयात शुल्क लादले होते. यामुळे भारतातील अनेक क्षेत्रातील निर्यातीवर थेट परिणाम झाला आहे. कापड, वाहनाचे पार्ट्स, धातू आणि लघु उद्योगांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे आता भारत आपल्या वस्तू विकण्यासाठी खरेदीदार शोधत आहे. भारताचे सध्या 26 देशांसोबत 15 एफटीए आणि 26 देशांसोबत 6 प्राधान्य व्यापार करार आहेत. तसेच 50 पेक्षा जास्त देशांसोबत कराराबाबत बोलणी सुरू आहेत. अलीकडेच भारताने युएई आणि ऑस्ट्रेलियासोबत व्यापार करार केले आहेत, त्यामुळे आता या देशांसोबतच्या व्यापाराला वेग येणार आहे.