
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्यानं भारताला धमकावत आहेत, भारतावर दबाव निर्माण करून आपला उद्देश साध्य करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र भारत सरकार ट्रम्प यांच्या या धमक्यांना जुमानत नाहीये, भारत सरकारचं धोरण सुस्पष्ट आहे. आमच्यासाठी राष्ट्रहीत सर्वप्रथम असल्याचं भारतानं अमेरिकेला ठणकावून सांगितलं आहे, आम्ही जोपण निर्णय घेऊ तो आमच्या देशाच्या हिताचा असेल असंही भारतानं म्हटलं आहे. सोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्थरावर देखील घडामोडींना वेग आला आहे, ज्यातून अमेरिकेला स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.
सध्या भारताकडून अशी काही पाऊलं उचलली जात आहेत, जी अमेरिकेला बिलकूल अपेक्षित नाहीयेत, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा चांगलाच जळफळाट होण्याची शक्यता आहे. एकीकडे रशिया आणि भारत चांगले मित्र आहेत, भारत आता रशियासोबत असलेली आपली मैत्री आणखी घट्ट करत आहे. तर दुसरीकडे भारत चीनसोबत असलेले आपले संबंध सुधारण्याचा प्रयत्न देखील करत आहे. भारत, चीन आणि रशिया हे तीन मोठे देश कधीच एकत्र येऊ नये असं अमेरिकेला वाटतं, मात्र त्या दृष्टीने आता हालचाली सुरू झाल्या आहेत.
भारताला रशियापासून दूर करण्याचा ट्रम्प यांचा डाव आहे, त्यासाठी वाटेल ते करण्याची ट्रम्प याची तयारी आहे, मात्र ट्रम्प जेवढा प्रयत्न करत आहेत, तेवढी रशिया आणि भारताची मैत्री आणखी बजबूत होत आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यानंतर आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे पुढच्या आठवड्यात रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तर दुसरीकडे सप्टेंबरमध्ये पुतिन भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. तर येत्या 18 ऑगस्टला चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत, त्यामुळे चीन, भारत आणि रशियामधील संबंध आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे, टॅरिफच्या निर्णयानंतर चीन आणि रशियानं भारताला समर्थन दिलं आहे. चीनने अमेरिकेला चांगलंच सुनावलं होतं.