
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, त्यामुळे याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकते अशी चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र आता समोर आलेल्या बातमीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफचे फास उलटे पडण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील अनेकदा असं घडलं आहे. जेव्हा-जेव्हा कोणी भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा -तेव्हा भारतानं सडेतोड उत्तर दिलेलं आहे. दरम्यान जर यावेळी सगळं ठीक राहिलं तर ट्रम्प यांचा टॅरिफ प्लॅन त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे.
भारताकडून जीएसटीमध्ये कपात करण्याची योजना बनवण्यात आली आहे, यामुळे मागणीमध्ये वाढ होऊन, देशांतर्गत बाजाराला मोठा बुस्ट मिळणार आहे. देशांतर्गत मार्केट तेजीमध्ये राहिल्यास आपोआपच टॅरिफचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील प्रभाव कमी होणार आहे. भारतातील काही असे सेक्टर आहेत, जे आजही मोठ्या प्रमाणात अमेरिकेच्या बाजारपेठेवर अवलंबून आहेत, टॅरिफमुळे या क्षेत्रांना फटका बसू शकतो, मात्र भारतानं जीएसटीमध्ये कपात करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्यामुळे हे नुकसान देखील भरून निघू शकतं.
तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफमुळे भारताचा जीडीपी 0.2 टक्के ते 0.6 टक्क्यांच्या आसपास कमी होऊ शकतो. मात्र याचा फारसा असा गंभीर परिणाम होणार नाही, मात्र जे क्षेत्र बऱ्याच अंशी अमेरिकन बाजारपेठेवर अवलंबून आहेत, त्याला याचा फटका बसू शकतो. मात्र आता त्यावर भारतानं मजबूत तोड शोधून काढला आहे. भारत सरकार जीएसटी स्लॅबमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे. सध्या जीएसटीचे चार स्लॅब आहेत, 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के हे स्लॅब कमी करून फक्त दोनच स्लॅब 5 टक्के आणि 18 टक्के करण्याचा विचार सरकार करत आहे. जर जीएसटी कमी झाला तर वस्तुंच्या किंमती कमी होतील आणि त्यामुळे देशांतर्गत बाजाराला चालना मिळेल, परिणामी त्यामुळे टॅरिफचा भारतीय अर्थव्यवस्थेवर निर्माण होणारा प्रभाव कमी करण्यास मदत होणार आहे.