
India Pakistan War : पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता कोणत्याही क्षणी युद्धाला सुरूवात होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण भारताची राजधानी दिल्लीमध्ये सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. बैठकांचे सत्र चालू आहे. दुसरीकडे येत्या 7 मे रोजी देशभरात ठिकठिकाणी मॉक ड्रिल घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. असे असतानाच आता मॉक ड्रिल म्हणजे काय? तसेच मॉक ड्रिलमध्ये सांगितलं जाणारं सायरन आणि ब्लॅकआऊट नेमकं काय आहे? असं विचारलं जात आहे.
येत्या 7 मे रोजी देशभरात ठिकठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. एकूण 244 जिल्ह्यांत या मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात येईल. या काळात सर्तक राहण्याचा संदेश म्हणून ठिकठिकाणी सायरन वाजवले जातील. तसेच ठिकठिकाणी ब्लॅकआऊटही होईल. युद्धजन्य परिस्थिती, आपत्कालीन स्थिती निर्माण झालीच तर सुरक्षित ठिकाणी कसं जायचं, याबाबत सांगितलं जाईल. युद्धाची घोषणा झाली तर सामान्यांनी स्वत:चे रक्षण कसे करावे? दुसऱ्यांचीही काळजी कशी घ्यावी? याची माहिती या मॉक ड्रिलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
ज्या देशात युद्धाची शक्यता असते तिथे नागरिकांना सूचना देण्यासाठी एअर रेड वॉर्निंग सायरन वाजवले जाते. इस्रायल आणि युक्रेन यांच्यातील युद्धावेळीदेखील अशाच प्रकारचे सायरन वाजवण्यात आले. आजदेखील विमानतळं, वायुसेनेकडे अशा प्रकारचे एअर रेड सायरन आहेत. शत्रू राष्ट्राकडून आपल्या देशावर जर रॉकेट, मिसाईल किंवा फायटर जेटच्या माध्यमातून हल्ला केला जात असेल तर हा सायरन वाजवला जातो. त्यामुळे शत्रूने हल्ला करण्याआधीच सामान्य लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची संधी मिळते.
ब्लॅकआऊट म्हणजे अंधार. ब्लॅक आऊटचा आदेश आल्यानंतर सर्व लाईट्स बंद केले जातात. रात्री जेव्हा सायरन वाजेल तेव्हा सगळीकडचे लाईट्स बंद करावे लागतात. यालाच ब्लॅकआऊट म्हटले जाते. यामुळे शत्रूला त्याचे टार्गेट शोधण्यात अडचणी येतात.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1971 साली युद्ध झालं होतं. या युद्धात सायरन वाजल्यानंतर काय घडायचं याबाबत दिल्लीच्या द्वारका येथे राहणाऱ्या रमेश मुमुक्षू यांनी माहिती दिली आहे. सायरन वाजल्यानंतर सगळीकडे गडबड व्हायची. घराच्या बाहेर असणारे लोक लगेच घरात जायचे. जे घराच्या फार दूर असायचे ते लोक जमिनीवरच झोपून जायचे. घराच्या सर्वच खिडक्यांवर काळा रंग लावण्यात आला होता. तुम्ही विडी ओढण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्या उजेडामुळे तुमच्यावर बॉम्ब पडण्याची शक्यता आहे, असे सांगितले जायचे, अशी आठवण रमेश मुमुक्षू यांनी सांगितली.