
भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणलेले असताना भारत आणि चीन आता आणखी जवळ येताना दिसत आहेत. भारताने अलीकडेच चिनी नागरिकांसाठी पर्यटन व्हिसा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता चीनी पर्यटक भारतात सहजपणे प्रवेश करू शकतात. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होणार आहे. दोन्ही देशांमधील सीमेवर असलेला तणाव आता कमी झाला आहे, त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारत असल्याचे दिसत आहे. यामुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे.
भारत चीन आणि रशिया हे देश एकत्र येऊ नये अशी अमेरिकेची इच्छा आहे, कारण असे झाल्यास अमेरिकेसमोरची चिंता वाढू शकते. 2020 मध्ये गलवान खोऱ्यात सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर चिनी नागरिकांसाठी व्हिसा देणे बंद केले होते. मात्र आता संबंध सुधारत असताना व्हिसा पुन्हा एकदा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हा निर्णय दोन्ही देशांमधील संपर्क वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
या निर्णयाबाबत सूत्रांनी सांगितले की, गेल्या काही काळापासून भारत आणि चीनने संबंध स्थिर करण्यावर भर देण्याचे ठरवले आहे. याचाच एक भाग म्हणून 2020 पासून बंद असलेली विमानसेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. तसेच कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणे आणि बिझनेस आणि इतर श्रेणीतील प्रवाशांसाठी व्हिसा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याची अपेक्षा आहे.
दोन्ही देशांच्या सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी ऑक्टोबर 2024 मध्ये, दोन्ही देशांनी एलएसीवरील सैन्य मागे घेण्याचे मान्य केले आहे. या करारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची कझान येथे भेट झाली होती. त्या भेटीत दोन्ही संबंध सामान्य करण्याचा आणि सीमा वाद सोडवण्याबाबत चर्चा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि सीमा वाटाघाटीसाठी विशेष प्रतिनिधींमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या होत्या. यामुळे बऱ्याच क्षेत्रांमधील संबंध सुधारले आहेत.