भारत सरकारचा मोठा निर्णय! व्हिसाच्या श्रेणी 13 वरून 9 वर, अर्जातील कॉलमही 70 टक्क्यांनी कमी

भारत सरकारने परदेशी नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया अधिक सोपी करण्याचा निर्णय घेतला आहे. व्हिसाच्या १३ श्रेणी कमी करून ९ करण्यात आल्या असून, अर्जातील कॉलमही ७० टक्क्यांनी कमी केले आहेत. या बदलामुळे परदेशी नागरिकांना भारताचा व्हिसा मिळवणे अधिक सुलभ होणार आहे.

भारत सरकारचा मोठा निर्णय! व्हिसाच्या श्रेणी 13 वरून 9 वर, अर्जातील कॉलमही 70 टक्क्यांनी कमी
visa
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Edited By: | Updated on: Nov 12, 2026 | 12:11 PM

भारत सरकारने परदेशी नागरिकांसाठी व्हिसा मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे बदल केले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने व्हिसाच्या मुख्य श्रेणींची संख्या १३ वरून ९ केली असून, उपश्रेणी ४९ वरून २३ करण्यात आल्या आहेत. याशिवाय व्हिसा अर्जातील माहिती भरण्याचे कॉलमही ६५ ते ७० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. या बदलांमुळे भारतात पर्यटन, शिक्षण, उपचार आणि व्यवसायासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

गृह मंत्रालयाने २७ ऑगस्ट २०२६ रोजी हे बदल केले. यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्येही व्हिसा श्रेणी २२ वरून १३ करण्यात आल्या होत्या. व्हिसा प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानकांचाही अभ्यास करण्यात आला आहे.

Loading...

टुरिस्ट व्हिसाचे नाव बदलले 

टुरिस्ट व्हिसाचे नाव बदलून व्हिजिटर व्हिसा करण्यात आले आहे. याचे V-1 आणि V-2 असे दोन प्रकार असतील. V-1 व्हिसा बिझनेस मीटिंग, वैद्यकीय सल्ला, वेलनेस रिट्रीट आणि अल्पकालीन अभ्यासक्रमांसाठी असेल. V-2 व्हिसा दीर्घकालीन पर्यटन आणि पर्वतारोहणासाठी दिला जाईल.

मेडिकल व्हिसामध्ये बदल 

वैद्यकीय उपचारांसाठी M-1 आणि M-3 असे दोन प्रकार असतील. M-1 व्हिसा आयुष उपचारांव्यतिरिक्त इतर वैद्यकीय उपचारांसाठी, तर M-3 व्हिसा आयुष उपचारांसाठी असेल. रुग्णांसोबत येणाऱ्या व्यक्तींसाठी M-2 आणि M-4 व्हिसाची तरतूद आहे.

विद्यार्थ्यांसाठी दोन प्रकार 

परदेशी विद्यार्थ्यांसाठी S-1 आणि S-2 असे दोन व्हिसा प्रकार असतील. S-1 शालेय, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी, तर S-2 पीएचडी, संशोधन, इंटर्नशिप आणि एक्सचेंज प्रोग्रामसाठी असेल.

बिझनेस व्हिसाच्या दोन श्रेणी 

व्यावसायिक कारणांसाठी B-1 आणि B-2 व्हिसा असतील. B-1 भारतात उद्योग किंवा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी, तर B-2 कमी कालावधीच्या व्यावसायिक कामांसाठी दिला जाईल. यामध्ये परिषद, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्रपट निर्मितीचा समावेश आहे.

तांत्रिक तज्ज्ञांना फायदा 

भारतीय कंपन्यांमध्ये मशीन बसवणे, देखभाल, गुणवत्ता तपासणी, उत्पादन आणि प्रशिक्षण यांसारख्या कामांसाठी येणाऱ्या परदेशी तज्ज्ञांना B-2 श्रेणी अंतर्गत ई-व्हिसा मिळू शकेल.

अर्ज प्रक्रिया सोपी 

व्हिसाच्या २३ उपश्रेणींसाठी अर्जातील माहितीचे कॉलम ६५ ते ७० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे अर्जदारांचा वेळ वाचणार असून अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

व्हिसाच्या नऊ मुख्य श्रेणी 

बिझनेस, डिप्लोमॅटिक, वर्क, जर्नलिस्ट, मेडिकल, ऑफिशियल, स्टुडंट, व्हिजिटर आणि मिसलेनियस अशा नऊ मुख्य श्रेणी असतील. मिसलेनियस व्हिसामध्ये भारतीय वंशाच्या व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय आणि इतर विशेष श्रेणींचा समावेश आहे.

१७२ देशांना ई-व्हिसा 

सध्या १७२ देशांतील नागरिकांना भारताची ई-व्हिसा सुविधा उपलब्ध आहे. नवीन व्हिसा व्यवस्थेनुसार माहिती तंत्रज्ञान प्रणाली अपडेट केली जात असून, २०२६ च्या अखेरपर्यंत सुधारित प्रक्रियेनुसार व्हिसा देण्यास सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us