
अमेरिकेनं जगभरात टॅरिफ वॉर सुरू केलं आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर अमेरिकेकडून ब्राझीलवर देखील टॅरिफ लावण्यात आला, दरम्यान चीनवर आधीपासूनच टॅरिफ होता, मात्र त्यातच आता चीनने अमेरिकेला होणाऱ्या रेअर अर्थ मिनिरलचा पुरवठा थांबवल्यानं चिडलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर आता तब्बल 100 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे.अमेरिकेनं चीनवर आता शंभर टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे, अमेरिका आणि चीनच्या या टॅरिफ वॉरमध्ये भारताचा आता मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेन चीनवर 100 टक्के टॅरिफ लावल्यामुळे चीनच्या वस्तू या अमेरिकेच्या बाजारात प्रचंड महाग होणार आहेत, त्याचा फायदा हा भारताला आपली निर्यात वाढवण्यासाठी होणार आहे. चीनच्या तुलनेत भारताच्या वस्तू स्वस्त असल्यामुळे अमेरिकेत आता भारतीय वस्तूंची मागणी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना भारतीय निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष एस सी रल्हन यांनी म्हटलं आहे की, अमेरिकेनं चीनवर लावलेल्या प्रचंड टॅरिफमुळे पुन्हा एकदा अमेरिकेच्या बाजारपेठेत भारतीय वस्तुंची मागणी वाढू शकते, त्याचा थेट फायदा हा भारताला होणार आहे.
भारताने 2024-25 मध्ये अमेरिकेला 86 अब्ज डॉलर रुपयांचं सामान निर्यात केलं होतं, याचा अर्थ आता असा होतो की चीन आणि अमेरिकेमध्ये जो तणाव निर्माण झाला आहे, त्याचा थेट फायदा आता भारताला होणार आहे. एक नोव्हेंबरपासून चीनी वस्तूंवर शंभर टक्के टॅरिफ लावला जाईल अशी घोषणा अमेरिकेनं केली आहे. अमेरिकेच्या या घोषणेमुळे आता चीनी वस्तूंवर अमेरिकेत 130 टक्के टॅरिफ लावला जाणार आहे, चीनने अमेरिकेला होणाऱ्या रेअर अर्थ मिनिरल्सचा पुरवठा थांबवल्यानं त्याला प्रतिक्रिया म्हणून अमेरिकेनं हा निर्णय घेतला आहे. याचा मोठा फटका आता अमेरिकेला बसण्याची शक्यता आहे, कारण अमेरिकेतलं उद्योग क्षेत्र हे पूर्णपणे रेअर अर्थ मिनिरल्ससाठी चीनवर अवलंबून आहे, तर दुसरीकडे अमेरिकेनं भारतावर देखील आधीपासूनच 50 टक्के टॅरिफ लावला आहे.