इंडियन आर्मीचा नाद खुळा! थेट सियाचीनमध्ये उभे केले टॉवर्स, सैनिकांना 5 जी नेटवर्क मिळणार!

भारताने आता लडाखसारख्या भागात मोठी क्रांती घडवून आणली आहे. लडाखमधील दुर्गम आणि अतिशय उंचीवर असणाऱ्या भागात आता मोबाईल कनेक्टिव्हीटी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

इंडियन आर्मीचा नाद खुळा! थेट सियाचीनमध्ये उभे केले टॉवर्स, सैनिकांना 5 जी नेटवर्क मिळणार!
mobile tower at Siachen Glacier
| Updated on: Apr 20, 2025 | 5:25 PM

भारतात अशी काही ठिकाणं आहेत, जिथं जाणं आजदेखील फार अवघड आहे. विशेष म्हणजे या भागांत दळणवळण, मोबाईल नेटवर्क अशा सुविधादेखील नाहीत. यात काश्मीर आणि लडाख या प्रदेशातील काही भागाचाही समावेश होतो. दरम्यान, भारताने आता लडाखसारख्या भागात मोठी क्रांती घडवून आणली आहे. लडाखमधील दुर्गम आणि अतिशय उंचीवर असणाऱ्या भागात आता मोबाईल कनेक्टिव्हीटी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सैनिकांना 4G आणि 5G मोबाइल कनेक्टिव्हिटी

भारतीय सैनिकांसोबतच लडाख आणि काश्मीरमधील दुर्गम गावांत राहणाऱ्या नागरिकांनाही त्याचा फायदा होणार आहे. आता पू्र्व लडाख, पश्चिमी सडाख आणि सियाचीन यासारख्या अतिशय उंचीवर असणाऱ्या क्षेत्रांत पहिल्यांदाच सैनिकांना 4G आणि 5G मोबाइल कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. भारतीय सेनेच्या या निर्णयामुळे सैनिकांना आता आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधता येणार आहे. तसेच सैनिकांसोबतच दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांनाही या मोबाईल कनेक्टिव्हीटीचा फायदा होणार आहे.

लडाख, काश्मीरमध्ये मोबाईल नेटवर्क टॉवर्स

या भागात भारतीय सेना आणि टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या (TSPs) मदतीने मोबाईल कनेक्टिव्हीटी पोहोचू शकलेली आहे. या मोहिमेअंतर्गत लडाख आणि कश्मीरच्या सीमाक्षेत्रांत अनेक ठिकाणी मोबाईल टॉवर्सची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे सैनिक त्यांच्या कुटुंबीयांशी जोडले जाणार आहेत. तसेच तेथे सीमाभागात राहणाऱ्या गावकऱ्यांचा सामाजिक, आर्थिक विकास होण्यासही या मोहिमेचा उपयोग होणार आहे.

सैनिकांना कुटुंबीयांशी बोलता येणार

लडाख आणि काश्मीरसारख्या भागात असे काही दुर्गम भाग आहेत, जिथे भारतीय सैनिक सीमारक्षणाचे कठीण काम करतात. या भागात कुठेही मोबाईल नेटवर्क नव्हते. काही सैनिक तर 18,000 फूट उंचीवर तैनात असतात त्यामुळे त्यांचा संपर्क जवळजवळ सर्वांपासूनच तुटतो. आता याच भागात 4G आणि 5G नेटवर्क उपलब्ध करून देण्यात आलंय. त्यामुळे सैनिकांच्या कर्तव्यात सुधारणा होण्यास मदत होणार आहे. तसेच सैनिकांना त्यांच्या कुटंबीयांशीही सतत संपर्क साधता येणार आहे. यामुळे सैनिकांना मानसिक तणावातून मुक्तता मिळण्यास मदत होणार आहे.

सियाचीन ग्लेशियरवरदेखील थेट 5G मोबाइल टॉवर्सची स्थापना

दरम्यान, भारताचा हा निर्णय म्हणजे तेथील स्थानिक गांवासाठी जणू दुसरी डिजिटल क्रांतीच असल्याचं म्हटलं जातंय. लडाख आणि काश्मीरमध्ये मोबाईल नेटवर्क टॉवर्स स्थापन करण्यात आल्यामुळे आता सीमाक्षेत्रातील गावकऱ्यांना मोबाईल कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या मोहिमेअंतर्गत भारताने सियाचीन ग्लेशियरवरदेखील थेट 5G मोबाइल टॉवर्सची स्थापना केलेली आहे. ही कामगिरी म्हणजे भारताचे तंत्रज्ञान क्षेत्रातील सामर्थ्याचे प्रतिक आहे, असे म्हटले जात आहे. भारताच्या या डिजीटल रणनीतीचे सर्वच स्तरांतून स्वागत केले जात आहे.