
S Jaishankar gave a statement: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आज सुरू झाला खरा, पण या अधिवेशनाची सुरूवात अतिशय वादळी झाली. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षाबाबत आणि मध्य पूर्वेतील संकटाबाबत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत निवेदन दिलं. तिथे भारत सरकारने उचललेल्या पावलांचीही त्यांनी माहिती दिली. या भागात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेला भारत सरकारचं प्राधान्य आहे, संपूर्ण परिस्थितीवर, आखाती संघर्षावर पंतप्रधान मोदी यांचं, सरकारचं बारकाईने लक्ष आहे असं त्यांनी नमूद केलं. सर्व बाजूंनी तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच मार्ग आहे, ही सरकारची भूमिका त्यांनी मांडली.
10 दिवसांपासून इराण आणि अमेरिका – इस्त्रायल यांच्यात जोरदार युद्ध सुरू असून अमेरिका व इस्रायलने इराणवर संयुक्तपणे हल्ले चढवले. याचा फटका बसताच इराणही चवताळून उठला आणि चोख प्रत्यु्तर दिलं. अमेरिकी सैनिकांचे ज्या देशात तळ आहेत त्यावरही इराणने हल्ला चढवला. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धाबाबत भारताची भूमिका काय,अधिकृत प्रतिक्रिया काय याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. अखेर आज एस जयशंकर यांनी राज्यसभेत निवेदन देत सरकारची भूमिका, परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी उचलली जाणारी पावलं याबद्दल त्यात नमूद केलं.
पश्चिम आशियातील परिस्थितीवर राज्यसभेत बोलताना परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले, “तेथे सुरू असलेला संघर्ष हा भारतासाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. आपण शेजारील प्रदेशात आहोत आणि पश्चिम आशियात स्थिरता राखणे ही आपली स्पष्ट जबाबदारी आहे. जवळजवळ 1 कोटी भारतीय आखाती देशांमध्ये राहतात आणि काम करतात. इराणमध्येही हजारो भारतीय शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी गेले आहेत असं ते म्हणाले. “हा प्रदेश आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचा आहे आणि त्यात तेल आणि वायूचे अनेक महत्त्वाचे पुरवठादार आहेत. पुरवठा साखळीतील गंभीर व्यत्यय आणि त्यामुळे निर्माण होणारी अस्थिरता ही आपल्यासाठी गंभीर समस्या आहेत. या संघर्षाचा ऊर्जेच्या गरजांवर काय परिणाम होऊ शकतो याबद्दल भारत सतर्क आहे”, असंही जयशंकर यांनी नमूद केलं.
युद्धाचं समर्थन नाही
” हा संघर्ष वाढतच चालला असून या प्रदेशातील सुरक्षा परिस्थिती लक्षणीयरीत्या बिघडली आहे. हा संघर्ष इतर देशांमध्ये पसरला आहे आणि विध्वंस वाढत आहे. या युद्धाचा सामान्य जीवन आणि क्रियाकलापांवर स्पष्टपणे परिणाम होत आहे. पश्चिम आशियातील परिस्थिती आपल्या सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे असंही परराष्ट्र मंत्र्यांनी नमूद केलं.
आखाती प्रदेशात लवकर सामान्य स्थिती परत आणण्याचे आवाहन करताना परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, आखाती देशांमध्ये परिस्थिती तणावपूर्ण आहे आणि सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारताला हा प्रश्न राजनैतिक आणि संवादाद्वारे सोडवायचा आहे. या संघर्षात झालेल्या जीवितहानीमुळे भारत दु:खी आहे. आम्ही सर्व पक्षांना शांततेचे आवाहन करतो. या संघर्षाचा सामान्य जीवन आणि व्यवसायांवर परिणाम होत आहे. तेहरानमधील भारतीय दूतावास इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी सरकार काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
“The Prime Minister continues to closely monitor the emerging developments, and relevant ministries are coordinating to ensure effective responses,” says EAM Dr S Jaishankar as he makes a statement in the Rajya Sabha on the situation in West Asia. https://t.co/AXC9nujGpk pic.twitter.com/dDLt9S92QH
— ANI (@ANI) March 9, 2026
भारताला हे संकट चर्चेद्वारे सोडवायचं आहे, भारत शांततेच्या बाजूने आहे. भारत हा शांतता, संवाद आणि राजनैतिक मुत्सद्देगिरी यांच्या पक्षात आहे. भारत कधीही युद्धाचे समर्थन करत नाही, तणाव कमी करणे, संयम बाळगणे आणि या प्रदेशातील नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे या गोष्टींना भारत समर्थ देतो, असंही परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले.
सरकारने 28 फेब्रुवारी रोजी एक निवेदन जारी करून सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन केलं आणि तीव्र चिंता व्यक्त केली. तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि राजनैतिक कूटनीतिचा अवलंब केला पाहिजे असा आमचा विश्वास आहे. ” असं सभागृहात परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले.