
गेल्या काही दिवसांपासून विमानप्रवासात प्रवाशांची तब्बेत बिघडल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. आताही चेन्नईहून गुवाहाटीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका प्रवाशाची प्रकृती बिघडली होती. हा प्रवासी बेशुद्ध पडला होता. मात्र विमान हवेत असताना भारतीय लष्कराच्या एका डॉक्टरने या प्रवाशाचा जीव वाचवला आहे. त्यामुळे या डॉक्टरचे कौतुक होत आहे. विमानात नेमकं काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
प्रवाशाची प्रकृती बिघडली
समोर आलेल्या माहितीनुसार, इंडिगोच्या 6ई-6011 या विमानात 14 जुलैला सायंकाळी 6.20 वाजता एका 75 वर्षीय प्रवाशाची प्रकृती बिघडली. या व्यक्तीला घाम आला आणि तो बेशुद्ध पडला. या व्यक्तीचे हातपाय थंड पडू लागले होते. त्याला हायपोग्लाइसेमियाची लक्षणे दिसू लागली होती. त्यामुळे विमानात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र विमानातील एका सहप्रवाशाने या रुग्णाचे प्राण वाचवले आहे.
मेजर मुकुंदन यांनी केले उपचार
विमानातील केबिन क्रूने तातडीने या रुग्णाला ऑक्सिजन दिला. तसेच विमानात कोणी डॉक्टर असेल तर मदत करा अशी सूचना केली. त्यावेळी रजेवरून परतणारे लष्कराचे डॉक्टर मेजर मुकुंदन यांनी तातडीने रुग्णाला मदत केली. रुग्णाच्या तपासणीत त्यांना हा व्यक्ती अर्धबेशुद्ध अवस्थेत असल्याचे समजले. त्यात हायपोग्लायसेमियाची लक्षणे स्पष्टपणे दिसत होती.
साखर आणि ओआरएस पाजले
डॉक्टर मेजर मुकुंदन यांनी तातडीने उपचाराला सुरुवात केली. मेजर मुकुंदन यांनी रुग्णाच्या महत्वाच्या अवयवांचे आणि ऑक्सिजनच्या स्थितीचे निरीक्षण केले आणि त्यांना साखर आणि ओआरएस पाजले. यामुळे रुग्णाच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली. मेजर मुकुंदन हे रुग्णाच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेऊन होते.
विमानतळाच्या आपत्कालीन कक्षात उपचार
यानंतर विमान गुवाहाटीत उतरताच, रुग्णाला विमानतळाच्या आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आले. तिथेही मेजर मुकुंदन यांनी उपचार सुरू ठेवले. थोड्या वेळाने हा रुग्ण शुद्धीवर आला आणि रात्री 8 वाजेपर्यंत त्याची प्रकृती स्थिर झाली. मेजर मुकुंदन यांच्या उपचारांमुळे आणि विमान कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे प्रवाशाचे प्राण वाचले, त्यामुळे सर्वच स्तरातून डॉक्टर मेजर मुकुंदन यांचे कौतुक होत आहे.