हवेतच इंडिगो विमानावर वीज कोसळली अन्…; १७ हजार फूट उंचीवर घबराट, १०४ प्रवाशांचा थरारक अनुभव

IndiGo Flight News: खराब हवामानात पाटणा ते लखनौला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानावर वीज पडली. यामुळे चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरवले.

हवेतच इंडिगो विमानावर वीज कोसळली अन्...; १७ हजार फूट उंचीवर घबराट, १०४ प्रवाशांचा थरारक अनुभव
| Updated on: Oct 07, 2026 | 11:50 PM

खराब हवामानात पाटणा ते लखनौला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानावर वीज पडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना घडली तेव्हा विमान अंदाजे १७,००० फूट उंचीवर होते. वीज पडल्याने विमानाच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. मात्र वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत लखनौच्या चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरवले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे नियमित देशांतर्गत विमान क्रमांक 6E-925 बुधवारी दुपारी ३:१० वाजता पाटणा विमानतळावरून उड्डाण केले. हे विमान दुपारी ४:२० वाजता लखनौ येथे पोहोचणार होते. खराब हवामानात लखनौच्या हवाई क्षेत्रात विमान सुमारे १७,००० फूट उंचीवर घिरट्या घालत असताना विमानावर वीज पडली. ज्यामुळे त्याच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले. काही क्षणांसाठी विमानात घबराट पसरली.

Loading...

त्यानंतर वैमानिकाने विमान सुरक्षितपणे उतरवले. खराब हवामानात विमानावर वीज पडल्यानंतर, सुरक्षितपणे उतरणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. वैमानिकाने प्रसंगावधान राखून विमान लखनौ विमानतळाकडे वळवले. विमान उतरल्यावर प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. विमान दुपारी अंदाजे ४:०५ वाजता लखनौ विमानतळावर उतरले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित होते. वेळापत्रकानुसार, हेच विमान 6E-6968 या क्रमांकाने सायंकाळी ५:०५ वाजता लखनौहून अहमदाबादसाठी निघणार होते. वीज पडल्याने विमानात तांत्रिक बिघाड झाला.

परिणामी हे विमान लखनौ विमानतळावर थांबवण्यात आले. इंडिगोने प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था केली. त्यानंतर अहमदाबादला जाणाऱ्या सर्व प्रवाशांना सायंकाळी अंदाजे ६:२२ वाजता दुसऱ्या विमानाने रवाना करण्यात आले. वीज पडलेल्या विमानाची तांत्रिक तपासणी करण्यासाठी एअरलाइन अभियंत्यांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तांत्रिक बिघाडाचे कारण शोधण्यासाठी अभियंते विमानाची तपासणी करत आहेत.

विमानचालन तज्ज्ञांनी सांगितले की, वादळी ढगांमध्ये मोठे गारांचे खडकही लपलेले असतात. त्यांच्याशी टक्कर झाल्यास विमानाच्या पुढील भागाचे नुकसान होऊ शकते. पक्षी धडकण्याचीही शक्यता आहे. वीज पडल्याचाही संशय आहे. परंतु अशी घटना घडण्याची शक्यता नगण्य आहे. वैमानिकाचा अहवाल गोपनीय ठेवण्यात आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us