International Womens Day : आज चेस ग्रँडमास्टर वैशालीकडे PM मोदींच्या X अकाऊंटची जबाबदारी, तिने लिहिलं की…

International Womens Day : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच औचित्य साधून एक अनोखी गोष्ट केली आहे. आज भारताच्या चेस ग्रँडमास्टर वैशालीकडे PM मोदींच्या X अकाऊंटची जबाबदारी आहे.

International Womens Day : आज चेस ग्रँडमास्टर वैशालीकडे PM मोदींच्या X अकाऊंटची जबाबदारी, तिने लिहिलं की...
Chess GM Vaishali
Image Credit source: X/Narendra Modi
| Updated on: Mar 08, 2025 | 11:38 AM

आज 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवसाच औचित्य साधून एक अनोखी गोष्ट केली आहे. त्यांनी आजच्या दिवसासाठी आपली सोशल मीडिया प्रॉपर्टी म्हणजे अकाऊंटस महिलांकडे सोपवलं आहे. विविध क्षेत्रात छाप उमटवणाऱ्या महिला आज पीएम मोदींच अकाऊंट्स संभाळणार आहेत. बुद्धिबळाच्या खेळात नाव उंचावणारी चेस ग्रँडमास्टर वैशाली सुद्धा आज पीएम मोदी यांचं सोशल मीडिया अकाऊंट हाताळणार आहे. आज महिला दिनी ग्रँडमास्टर वैशालीने पीएम मोदींच्या X हँडलवरुन पोस्ट केली आहे.

“वनाक्कम मी वैशाली, आज महिला दिनी, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं सोशल मीडिया अकाऊंट हाताळण्याचा अनुभव खूप रोमांचक आहे. मी चेस खेळते, हे तुमच्यापैकी अनेकांना माहित आहे. अनेक स्पर्धांमध्ये आपल्या देशाचं प्रतिनिधीत्व करताना मला अभिमान वाटतो” असं वैशालीने पीएम मोदींच्या X अकाऊंटवरुन पोस्ट करताना म्हटलं आहे.

चेस खेळणं हा माझ्यासाठी शिकण्याचा अनुभव

“माझा जन्म 21 जूनला झाला. योगायोगाने हा दिवस आता आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून प्रसिद्ध आहे. मी वयाच्या 6 व्या वर्षापासून चेस खेळायला सुरुवात केली. चेस खेळणं हा माझ्यासाठी शिकण्याचा, भारावून टाकणारा, आनंद देणारा अनुभव आहे. ऑलिंपियाड आणि अन्य स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशातून ते दिसून आलं” असं वैशाली म्हणाली.

खेळ सुद्धा उत्तम शिक्षक

“मला FIDE रँकिंग सुधारण्यासह देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करायची आहे. बुद्धिबळाने मला भरपूर काही दिलं आणि माझ्या आवडत्या खेळात मला सुद्धा योगदान द्यायचं आहे. मला तरुण मुलींना हेच सांगायच आहे की, त्यांना आवडतं तो खेळ त्यांनी निवडावा. खेळ सुद्धा उत्तम शिक्षक आहे” असं वैशालीने म्हटलय.


हे माझं भाग्य

मुलींना पाठबळ देण्याच तिने आवाहन केलं. त्याचवेळी आपल्याला असे पालक लाभले हे भाग्य असल्याच तिने सांगितलं. मुलींना पाठिंबा द्या. त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. त्या चमत्कार घडवून दाखवतील. माझ्या आयुष्यात मला असे पाठिंबा देणारे पालक लाभले. थिरु रमेशबाबू आणि थिरुमती नागालक्ष्मी. माझा भाऊ. त्यांच्यासोबत माझं खास नातं आहे. चांगले प्रशिक्षक, सहकारी मिळाले हे सुद्धा माझं भाग्य. विश्वनाथन आनंद सर हे माझे प्रेरणास्थान आहेत असं वैशालीने सांगितलं.