पंतप्रधान जेथे चहा विकायचे त्या स्थानकावर आयआरसीटीसीने उघडला फूड प्लाझा

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या स्थानकावर चहा विकायचे त्या स्थानकावर आयआरसीटीसीने एक फूड प्लाझा उघडला आहे. या फूड प्लाझाची थीम 'चहा'वर आधारित आहे.

पंतप्रधान जेथे चहा विकायचे त्या स्थानकावर आयआरसीटीसीने उघडला फूड प्लाझा
irctct food plaza
| Updated on: Sep 17, 2025 | 9:25 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस आज सर्वत्र साजरा केला जात आहे. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे कार्यकर्ते देशभरात सेवा सप्ताह साजरा करत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीत देशाची प्रगती होत असून जगात देशाचा दबदबा निर्माण झाला आहे. मोदी यांनी मोठ्या कष्ठातून पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. ते गुजरातच्या ज्या वडनगर रेल्वे स्थानकावर चहा विकायचे त्या स्थानकावर आता आयआरसीटीसीने फूड प्लाझा उभारला आहे.

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड ( IRCTC ) वडनगर रेल्वे स्थानकावर आधुनिक फूड प्लाझाची सुरुवात केली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. वडनगर रेल्वे स्थानकावरील हा फूड प्लाझा ३८३ चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरलेला आहे. या प्लाझात ५२ प्रवाशांच्या आसनाची सोय केलेली आहे. या प्लाझाची थीम खास ‘चहा’वर आधारीत आहे. येथे प्रवाशांना पारंपारिक कटींग चहा, जस्मीनस अर्ल ग्रे आणि ग्रीन टी सारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रीमियम दर्जाचे चहा देखील मिळणार असल्याचे आयआरसीटीसीच्या प्रवक्ताने म्हटले आहे.

या प्लाझाच्या प्रवेशद्वारावर खास तयार केलेली ‘विंटेज टी स्टॉल’ अशी सजावट आणि रचना पारंपरिक चहाच्या टपऱ्यांची आठवण करुन देणारी असून प्रवाशांसाठी नॉस्टॅल्जिक वातावरण पुन्हा जिवंत करत असून प्रवाशांना खास अनुभव देत आहे.वडनगर रेल्वे स्थानकावरील फूड प्लाझा प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सेवा देणार आहे आणि त्यांचा प्रवास अनुभव अधिक समृद्ध करेल. चहा-थीमवर आधारित हा संकल्पना-आधारित उपक्रम प्रवाशांसाठी आगळावेगळा आणि सोयीस्कर ठरणार आहे असे IRCTC पश्चिम विभागाचे ग्रुप महाव्यवस्थापक गौरव झा यांनी म्हटले आहे.

रेल्वेमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि IRCTCचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय कुमार जैन यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा आणि उत्कृष्ट सेवा पुरवण्यासाठी IRCTC सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असल्याचे IRCTC च्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.