10 हजाराहून अधिक सैनिकांना एकाच वेळी योगाचे धडे; ईशा फाऊंडेशनचा अनोखा विक्रम
ईशा फाउंडेशनकडून देशभरातील 10,000 हून अधिक संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी मोफत योग सत्रे आयोजित करण्यात आली होती. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ही सत्रे पार पडली.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ईशा फाउंडेशनकडून देशभरातील 10,000 हून अधिक संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी मोफत योग सत्रे आयोजित करण्यात आली होती. तसेच संपूर्ण देशात 2500 हून अधिक मोफत योग सत्रे आयोजित करण्यात आली होती, यात संरक्षण कर्मचारी, कॉर्पोरेट व्यावसायिक, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांनी भाग घेतला होती.
ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ही सत्रे पार पडली. 11 हजारांपेक्षा अधिक प्रशिक्षित योग वीरांमुळे हा मोठा उपक्रम शक्य झाला. ही सत्रे शाळा, महाविद्यालये, कार्यालये, व्यायामशाळा आणि तुरुंग अशा विविध ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. आज 2 हजारांवपरून अधिक युवा राजदूतांनी सद्गुरुंनी त्यांच्या मानसिक आरोग्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी डिझाइन केलेले ‘मिरॅकल ऑफ माइंड’ नावाचे साधे पण प्रभावी 7 मिनिटांचे मार्गदर्शित ध्यान करून मानसिक आरोग्याचे महत्त्व सांगितले.
यावेळी सद्गुरू यांनी ट्विटरवरून साधकांना दिव्य संदेश दिला आहे.’योग ही अशी प्रणाली आहे जी तुम्हाला सजग निवडीचे जीवन निर्माण करण्याची मोकळीक देते, असे जीवन जे जबरदस्तीच्या विचारांवर आणि कृतींवर अवलंबून नसते. जेव्हा तुम्ही सजग होऊन त्या जबरदस्तीपलीकडे जाऊ शकता, तेव्हाच तुमचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य पूर्णपणे तुमच्या हातात येऊ शकते,’ असं सद्गुरू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
ईशा फाउंडेशनने आयोजित केलेल्या प्रमुख योग सत्रांपैकी एक सत्र बेंगळुरूमधील सद्गुरू सन्निधी येथे पार पडले. या सत्रात भारतीय सेना, नौदल, हवाई दल, सीमा सुरक्षा दल (BSF) आणि राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (NCC) मधील 5,000 हून अधिक संरक्षण कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होती. तसेच जवळच्या शाळा आणि महाविद्यालयांमधील 1,000 हून अधिक विद्यार्थीही सहभागी झाले होते.
इशा फाउंडेशनच्या इतर ठिकाणी झालेल्या योग सत्रांमध्येही मोठा सहभाग दिसून आला. राजस्थानमधील श्री गंगानगर येथे सुमारे 1,500 संरक्षण कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. जोधपूर एअरबेस येथील योग सत्रात 900 हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. तसेच पुण्यातील सत्रात 500 लष्करी जवान आणि जयगड किल्ल्यातील 400 जवान उपस्थित होते.
कोइम्बतूरमधील आदि योगी स्थळावर झालेल्या योग सत्रात भारतीय हवाई दल (रेडफिल्ड्स आणि सुलूर विंग 43), लष्कराची 35 वी रेजिमेंट (मदुक्कराय) आणि रॅपिड अॅक्शन फोर्स (वल्लालोर) मधील 200 हून अधिक जवान सहभागी झाले होते. याशिवाय आयआयटी चेन्नई सारख्या प्रतिष्ठित संस्था आणि एचडीएफसी बँक, आयबीएम, गोदरेज, एल अँड टी, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स आणि येस बँक सारख्या कॉर्पोरेट कार्यालयांमध्येही योग सत्रे आयोजित करण्यात आली होती.
सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, ईशा फाउंडेशन गेल्या 30 वर्षांपासून जगभरात योगाचे प्राचीन विज्ञान त्याच्या शुद्ध स्वरूपात उपलब्ध करून देत आहे. 400 केंद्रे आणि 1.7 कोटी स्वयंसेवकांच्या मदतीने फाउंडेशनचे उपक्रम मानवी कल्याणाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करतात. यावर्षी ईशा महाशिवरात्रीच्या निमित्ताने सद्गुरूंनी “मिरॅकल ऑफ माइंड” मोहीम सुरू केली, ज्याचे अॅप लाँच झाल्यानंतर 15 तासांत 10 लाख डाउनलोड झाले होते. सध्या या अॅपचे 25 लाखांहून अधिक युजर्स आहेत.
ईशा फाउंडेशनने आतापर्यंत 11 हजारांहून अधिक भारतीय लष्करी जवानांना शास्त्रीय हठ योगाचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच 500 हून अधिक लष्करी कर्मचाऱ्यांना त्यांच्या युनिट्समध्ये स्वतंत्रपणे योग सत्रे आयोजित करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे.
