
Dr. Eknath Chitnis Passed Away : आपले संपूर्ण आयुष्य अंतराळ संशोधनासाठी वाहून दिलेले तसेच भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमात मोलाचे योगदान देणारे वैज्ञानिक डॉ. एकनाथ वसंत चिटणीस यांचे दुखद निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. 22 ऑक्टोबरच्या सकाळीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी नुकतेच आपला 100 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या जाण्याने भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाची कधीही भरून न निघणारी हाणी झाल्याची भावाना व्यक्त केली जात आहे.
डॉ. चिटणीस हे भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमातील सुरुवातीच्या काही वैज्ञानिकांमधील एक वैज्ञानिक होते. त्यांनी अगोदर भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन समितीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली. भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन समितीचे नंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) असे नामकरण करण्यात आले. आज इस्रो ही अंतराळ संशोधनातील जगातील सर्वात महत्त्वाच्या संस्थांपैकी एक संस्था आहे. इस्रोने आतापर्यंत चांद्रयान, मंगलयान अशा मोहिमा यशस्वी करून दाखवलेल्या आहेत. डॉ. चिटणीस यांनी इस्रो या संस्थेच्या स्थापनेसाठीही महत्त्वाचे योगदान दिलेले आहेत.
केरळ येथील थुम्बा या लॉन्चपॅडच्या निवडीसाठीही डॉ. चिटणीस यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. आजदेखील थुम्बा हे भारताच्या अंतरिक्ष कार्यक्रमाचे महत्त्वाचे केंद्र आहे. डॉ. चिटणीस यांनी सर्व अभ्यास करूनच थुम्बा या ठिकाणाची निवड केली होती. 1981 ते 1985 या काळात डॉ. चिटणीस यांनी इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटर (एसएसी) सेंटरचे नेतृत्त्व केले होते. हे केंद्र गुजरातच्या अहमदाबाद येथे आहे. या सेंटरमध्ये उपग्रह आणि अंतराळ तंत्रज्ञानावर काम केले जाते. डॉ. चिटणीस यांच्या नेतृत्त्वाच्या काळातच भारताने अनेक अंतराळाच्या मोहिमा हाती घेतल्या होत्या.
डॉ. चिटणीस हे डॉ. विक्रम साराभाई यांचे सहकारी होते. डॉ. विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ संशोधन मोहिमेचे पितामह म्हटले जाते. डॉ. चिटणीस यांनी डॉ. विक्रम साराभाई यांना साथ देत भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रम पुढे घेऊन जाण्यास मदत केली. डॉ. चिटणीस यांनी महान वैज्ञानिक आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना मार्गदर्शन केलेले आहे. आज अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. डॉ. चिटणीस यांना पद्म भूषण या भारतातील तिसऱ्या सर्वात मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.