दिल्ली स्फोट : ‘जैश टेरर मॉड्युल’वर तगडी कारवाई; जम्मू-काश्मीरमधून महिला डॉक्टर ताब्यात

व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्युलचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अनंतनागमध्ये तैनात असलेल्या हरियाणाच्या एका महिला डॉक्टरला ताब्यात घेतलं आहे. डॉ. प्रियंका शर्मा असं तिचं नाव आहे. तिचा फोन आणि सिम कार्ड पोलिसांनी जप्त केला.

दिल्ली स्फोट : जैश टेरर मॉड्युलवर तगडी कारवाई; जम्मू-काश्मीरमधून महिला डॉक्टर ताब्यात
medical college
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 16, 2025 | 3:52 PM

जैश-ए-मोहम्मद दहशतवादी मॉड्युलच्या तपासात मोठ यश मिळालं आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या काऊंटर इंटेलिजन्स पथकांनी अनंतनागमध्ये छापा टाकला आणि तिथून हरियाणातील एक महिला डॉक्टरला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. अटक केलेल्या या डॉक्टरचं नाव प्रियंका शर्मा असं आहे. प्रियंका हरियाणातील रोहतक इथली रहिवासी होती. अनंतनागमधील मलखानाग परिसरात ती भाड्याच्या घरात राहत होती. तपासादरम्यान फोन कॉल ट्रेलमध्ये प्रियंकाचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर पथकांनी अनंतनागमध्ये छापा टाकला. घटनास्थळावरून एक मोबाइल फोन आणि सिम कार्ड जप्त करण्यात आलं आहे. फोन आणि सिम कार्ड फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे हरियाणा पोलिसांची टीम तिच्या कुटुंबाची माहिती आणि इतर तपशील गोळा करणार असल्याचं कळतंय.

प्रियंका उमरच्या संपर्कात होती

फोन ट्रेसिंगमधून प्रियंका उमरच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे. दिल्ली बॉम्बस्फोटात तिची नेमकी काय भूमिका होती आणि ती उमर नबीच्या संपर्कात का होती, हे तपासादरम्यान स्पष्ट होईल. डॉ. उमर नबी हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो अल-फलाह विद्यापिठाचा माजी विद्यार्थी आहे. बॉम्बस्फोटातील i20 कार तो स्वत: चालवत होता, असं तपासादरम्यान समोर आलं. कारमध्ये मेवातमधील खतांच्या दुकानांमधून खरेदी केलेलं अमोनियम नायट्रेट-आधारित स्फोटक पदार्थ भरलेले होते, असंही समजतंय.

उत्तर प्रदेशात 200 काश्मिरी विद्यार्थी रडारवर

याआधी पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर इथून हरियाणाच्या अल-फलाह विद्यापिठातील एमबीबीएसचा विद्यार्थी जानिसूर आलम ऊर्फ निसार आलम एनआयएनं ताब्यात घेतलं होतं. परंतु चौकशीनंतर त्याला शनिवारी संध्याकाळी सोडण्यात आलं. याप्रकरणी उत्तर प्रदेशात 200 काश्मिरी विद्यार्थी रडारवर आहेत. जवळपास 200 काश्मिरी वंशाचे वैद्यकीय विद्यार्थी आणि डॉक्टर्स चौकशीच्या कक्षे आले आहेत. कानपूर, लखनऊ, मेरठ आणि सहारनपूरसह अनेक शहरं आणि संस्थांच्या कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे.

पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतलेल्या डॉक्टरांमध्ये नूर इथला रहिवासी रेहान, फिरोजपूर झिरका इथला मोहम्मद, सुनहेरा इथला डॉ. मुस्तकीम आणि पिनांगवा इथला खत विक्रेता दिनेश सिंगला ऊर्फ डब्बू यांचा समावेश आहे. या सर्वांवर मुख्य आरोपी डॉ. उमर नाबीशी संपर्क साधण्याचा आरोप आहे. हे सर्व डॉक्टर्स फरीदाबाद इथल्या अल-फलाह विद्यापिठाशी संबंधित असल्याचं सांगण्यात आलंय.