Kanpur Murder Case : ‘ माझं नाव घेऊ नका, शालूला फसवा’; वडिलांच्या हत्येप्रकरणी सुब्रतचा धक्कादायक कबुलीजबाब, अखेर सुनेला क्लीनचीट
कानपूरमधील औषध व्यापारी विनीत मिनोचा हत्याकांडात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या हत्येचा कट पोटचा मुलगा सुब्रतनेच रचला होता. तपासानंतर अखेर पोलिसांनी मिनोचा यांची सून शालूला क्लीनचीट दिली आहे.

Kanpur Vineet Minocha Murder Case: “ 5 सप्टेंबरच्या रात्री मी विशाल आणि राजकिशोरशी बोललो होतो. आम्ही घरातून निघाल्यावर तुम्ही दोघं घरात या. मी त्यांना घराची चावीही दिली होती. विशालने त्याची डुप्लीकेट किल्ली बनवून घेतली. बाबा घरी आल्यावर तुम्ही खोलीतच लपून रहा. जेवून ते झोपले की एकाने त्यांचे पाय पकडा आणि दुसऱ्या व्यक्तीने उशीने त्यांचं तोंड दाबून हत्या करा, असं मी विशालला सांगितलं होतं. माझ्या बाबांचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध होते. बाबा दुसऱ्या स्त्रीशी लग्न करून तिला घरी वगैरे आणतील का अशी भीती सतत माझ्या मनात होती. संपतत्ती गमवावी लागेल, असंही मला वाटतं होतं.” कानपूरमधील विनीत मिनोचा हत्याकांडात नवा खुलासा झाला असून त्यांच्या मुलानेच हत्येचा कट रचल्याचे समोर आले. पोलिसांना दिलेल्या कबुलीत त्याने वरील सर्व गोष्टी सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
“ माझ्यावर 40 लाखांचं कर्ज होतं. दर महिन्याला 55 हजारांचा हप्ता भरावे लागतात. माझे वडील दर महिन्याला मला खर्चासाठी 40 हजार रुपये द्यायचे. हप्त्याचे पैसे कमी पडले की मी नवीन कर्ज घेऊन जुन्या कर्जाची परतफेड करत होतो किंवा क्रेडिट कार्ड स्वाइप करून पैसे उभे करत होतो. दुकानातून माल चोरी करूनही थोड्य पैशांची व्यवस्था करायचो. या कामात विशाल माझी मदत करत होता. विशाल दुकानात येत नव्हता, मीच माल बाहेर पोहोचवायचो,” असंही सुब्रतने सांगितलं.
शालूचा यात काही दोष नाही
“ किटी पार्टीच्या रात्री मी विशालला सांगितलं की त्या रात्री घरी कोणी नसेल. घरातला कॅमेरा बंद आहे आणि रेकॉर्डिंग मी बंद केलं होतं. तुम्ही माझ्या खोलीत जाऊन लपा. बाबा घरी आले की त्यांना आधी जेवण करू दे. ते जेव्हा झोपायला त्यांच्या खोलीत जातील तेव्हा त्यांची हत्या करा आणि घरातून निघून जा. मी दुसऱ्या दिवशी सकाळी घरी येईन आणि बाबांचा नैसर्गिक मृत्यू झालाय, असं नातेवाईकांना सांगेन. रात्री ते झोपले आणि सकाळी उठलेच नाही, असं मी सांगेन” असं तो म्हणाला. “ मी विशालला असंही सांगितलं होत की जर तुम्ही पकडले गेलात तर माझ नाव घेऊ नका, माझ्या पत्नीचं शालूचं नाव यात घ्या. पण या हत्येत शालूचा काहीच रोल नाही .” कानपूरमध्ये ज्यांची हत्या झाली, त्या विनीत मिनोचा यांच्या मुलाने हा सगळा कबुलीजबाब पोलिसांसमोर दिला. वडीलांची हत्या आपल्याच सांगण्यावरून झाल्याचं त्याने कबूल केलं.
सून शालूला क्लीनचीट
कानपूरच्या कल्याणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 सप्टेंबर रोजी झालेल्या औषध व्यावसायिक विनीत मिनोचा यांच्या हत्याकांडात पोलिसांनी मोठा उलगडा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनीत यांच्या हत्येचा कट त्यांचा मुलगा सुब्रत यानेच रचला होता. तपासादरम्यान त्याची भूमिका समोर आल्यानंतर पोलिसांनी सुब्रतला अटक केली. तर दुसरीकडे, हत्येच्या कटात आरोपी बनवून तुरुंगात पाठवण्यात आलेल्या विनीत यांची सून शालूला पोलिसांनी निर्दोष मानत क्लीन चिट देण्यात आली.
सुनेला फसवण्यासाठी रचला कट
तपासादरम्यान समोर आलेले पुरावे आणि आरोपींच्या चौकशीतून हत्येच्या कटात सुब्रतची भूमिका स्पष्ट झाली आहे, असं कानपूरचे पोलीस आयुक्त रघुवीर लाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. विनीत यांची सून शालूला हत्येच्या प्रकरणात गोवण्याच्या उद्देशाने संपूर्ण कट रचण्यात आला होता, असं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलीस कोठडीतील रिमांडदरम्यान तुरुंगातून आणलेला नोकर विशाल, राजकिशोर आणि सुब्रत यांची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी अनेक वेळा आरोपींना समोरासमोर बसवून प्रश्नोत्तरं विचारली. याचदरम्यान हत्येमागील कटाशी संबंधित महत्त्वाचं तथ्य समोर आलं.
18 दिवसांनी पती समोर येताच शालू भावूक
बुधवारी दुपारी सुमारे 12 च्या सुमारास पोलिसांना आरोपींची 24 तासांची पोलीस कोठडी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तीन राऊंड्समध्ये शालू आणि सुब्रत यांना समोरासमोर बसवून चौकशी केली. सुमारे 18 दिवसांनी पती सुब्रतला समोर पाहून शालू भावूक झाली. तू मला का अडकवतो आहेस ? असं तिने त्याला विचारलं, मात्र तेव्हा सुब्रत चूप राहिला. पोलिसांनी त्याला 20 पेक्षा जास्त प्रश्न विचारले. चौकशीदरम्यान त्याच्या उत्तरांमध्ये विसंगती आढळल्यानंतर पोलिसांचा संशय आणखी बळावला.
मुलाचे वडिलांवर गंभीर आरोप
पोलिसांच्या सांगण्यानुसार, चौकशीत अखेर सुब्रतने हत्येतील त्याच्या सहभागाची कबुली दिली. त्याने त्याचे वडील विनीत मिनोचांवर अनेक आरोपही लावले. त्याचे वडील महिलांवर पैसे खर्च करायचे, पण मला पैसे द्यायचे नाहीत, असं त्याचं म्हणणं होतं. मात्र पोलिस तपासात सुब्रतबद्दल वेगळीच माहिती समोर आली. तो खर्चिक स्वभावाचा होता. त्याला नशा आणि जुगाराची सवय लागली होती. आणि त्याच्यावर जवळपास 40 लाखांचं कर्ज होतं. या हत्येमागे आर्थिक कारणांशिवाय अजून काय मोटिव्ह होता, याचा पोलिस तपास करत आहेत.
