Lok Sabha Election 2024 : गौडबंगाल ? लोकसभेच्या 543 जागांसाठी मतदान, पण निवडणूक आयोगाच्या डेटामध्ये 1 जागा जास्त ? हे कसं घडलं ?

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात यंदा 7 टप्प्यात निवडणुकीसाठी मतदान होईल. मतदानाचा पहिला टप्पा 19 एप्रिलला सुरू होणार असून 1 जूनला शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. 4 जूनला मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे.

Lok Sabha Election 2024 : गौडबंगाल ? लोकसभेच्या 543 जागांसाठी मतदान, पण निवडणूक आयोगाच्या डेटामध्ये 1 जागा जास्त ? हे कसं घडलं ?
| Updated on: Mar 16, 2024 | 6:59 PM

नवी दिल्ली | 16 मार्च 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून देशभरात 19 एप्रिल ते 1 जून पर्यंत 7 टप्प्यांमध्ये लोकसभेसाठी मतदान होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या सांगण्यानुसार, 543 लोकसभा जागांसाठी झालेल्या मतदानाची 4 जून रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येईल. मात्र निवडणूक आयोगातर्फे जारी करण्यात आलेल्या डेटामध्ये काही गडबड दिसत असल्याचे समोर आले आहे. खरंतर, निवडणूक आयोगाने टप्प्याटप्प्याने लोकसभेच्या जागांची जी संख्या सांगितली आहे, त्यामध्ये 1 जागा जास्त आहे. म्हणजे संपूर्ण आकड्यांची बेरीज केल्यास ती 544 इतकी होत आहे. अशा प्रकारे निवडणूक आयोगाच्या डेटामध्ये लोकसभेची एक जागा वाढवून सांगण्यात आली.

निवडणूक आयोगनुसार लोकसभा निवडणुकांची तारीख आणि जागांची संख्या

पहिला टप्पा – 19 एप्रिल, 102 जागा
दुसरा टप्पा – 26 एप्रिल, 89 जागा
तिसरा टप्पा – 7 मे, 94 जागा
चौथा टप्पा – 13 मे, 96 जागा
पाचवा टप्पा – 20 मे, 49 जागा
सहावा टप्पा – 25 मे , 67 जागा
सातवा टप्पा – 1 जून, 57 जागा

मतमोजणी आणि निकाल

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आणि निकाल 4 जून रोजी एकत्र जाहीर केले जातील. याच दिवशी आंध्र प्रदेश, ओडिशा, अरूणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेच्या निवडणुकीचे निकालही समोर येतील. त्यासह विविध राज्यातील 56 विधानसभा पोटनिवडणुकीचे निकालही जाहीर होतील.

जागांची बेरीज करून पहा

निवडणूक आयोगातर्फे जारी करण्यात आलेल्या डेटानुसार, जागांची संख्या एकत्र करून पाहिली तर 102 + 89 + 94 + 49 + 57 + 57 = 544 ही बेरीज होते. पण देशभरात एकूण 543 जागांसाठी निवडणूक होत आहे. अशावेळी एका जागेचं अंतर हे निवडणूक आयोगाच्या चुकीकडे निर्देश करतं.

नक्की कन्फ्यूजन कुठे ? गौडबंगाल काय आहे ?

मणिपूरमध्ये 2 लोकसभेच्या जागा आहेत. निवडणूक आयोगाच्या डेटा शीटवर नजर टाकली तर दिसून येईल की निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात मणिपूरच्या दोन्ही जागांवर मतदान होणार असल्याचे दाखवले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात एका जागेवर मतदान होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

लोकसभेच्या 543 जागांसाठी सात टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिल ते 1 जूनपर्यंत हे मतदान होणार आहे. प्रत्येक मतदारसंघात एकाच दिवशी आपला खासदार निवडण्याची संधी मिळते, तथापि एकट्या मणिपूरमधील बाहरी मणिपूर लोकसभा मतदारसंघात दोन दिवस मतदान होणार आहे. उत्तर पूर्वी राज्यात नुकत्याच झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरिक मणिपुर लोकसभा मतदार संघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर बाहरी मणिपूर लोकसभा मतदारसंघात दोन तारखांना म्हणजे 19 एप्रिल आणि 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

चुराचांदपूर आणि चंदेल जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात मतदान होणरा आहे. दोन्ही जिल्ह्यात कुकी आणि मैतई समाजात हिंसा भडकली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.