Loksabha Election Result : एनडीए सरकारचा शपथविधी कधी होणार? तारीख आली समोर
Loksabha Election Result: देशात पुन्हा एकदा एनडीए सरकारला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा सरकार स्थापन होणार आहे. आता मोदी सरकारच्या शपथविधीची तारीख देखील समोर आली आहे.

Loksabha election result 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ला लोकांनी बहुमत दिले आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा मोदी सरकार बनत आहे. मोदींच्या या तिसऱ्या सरकारचा शपथविधी 9 जून रोजी होणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रपती भवनाने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनानुसार बुधवारी ५ जून ते ९ जून या कालावधीत राष्ट्रपती भवनाचे सर्किट-१ सर्वसामान्यांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रपती भवनात नव्या सरकारच्या शपथविधीची तयारी करण्यात येणार आहे.
लोकसभेच्या ५४२ जागांसाठी देशात सात टप्प्यात निवडणुका झाल्या. ४ जून रोजी मतमोजणी झाली. सुरुवातीपासूनच एनडीएने आपली आघाडी कायम ठेवली. पण नंतर इंडिया आघाडीच्या जागा वाढल्या. भाजपच्या जागा कमी झाल्याने स्वबळावर त्यांना बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे आता मित्रपक्षांसोबत त्यांना सरकार स्थापन करावे लागणार आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये अनेक ठिकाणी चुरस पाहायला मिळाली.
राष्ट्रपती भवन सर्वसामान्यांसाठी बंद
नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवन पुढच्या ९ तारखेपर्यंत सर्वसामान्य लोकांसाठी बंद राहणार आहे. राष्ट्रपती भवनाने एका निवेदनात म्हटले आहे की मंत्रिपरिषदेच्या आगामी शपथविधी समारंभाच्या तयारीमुळे, राष्ट्रपती भवन (सर्किट-1) 5 ते 9 जून 2024 पर्यंत सर्वसामान्यांसाठी बंद राहील.
या राज्यांमध्ये भाजपचे नुकसान
एनडीए 290 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. त्यापैकी एकट्या भाजपला 240 जागांवर मिळाल्या आहेत. तर इंडिया आघाडी 230 जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाला 100 जागांवर आघाडी मिळाली आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. 2019 च्या तुलनेत येथे भाजपच्या जागांमध्ये घट झालीये.
PM मोदी काय म्हणाले?
लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेचे आभार मानले. पीएम मोदी म्हणाले की, देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास व्यक्त केला आहे. भारताच्या इतिहासातील हा अभूतपूर्व क्षण आहे. या प्रेम आणि आशीर्वादासाठी मी माझ्या कुटुंबियांना प्रणाम करतो. मी देशवासियांना खात्री देतो की त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही नवीन ऊर्जा, नवीन उत्साह आणि नवीन संकल्प घेऊन पुढे जाऊ. मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या समर्पण आणि अथक परिश्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.
