मोठी बातमी: ‘कॉमन मॅन’चं बजेट कोलमडणार; घरगुती सिलेंडरच्या दरात इतक्या रुपयांची वाढ

| Updated on: Feb 15, 2021 | 9:31 AM

यापूर्वी 14.2 किलो LPG सिलेंडर गॅसची किंमत 719 रुपये इतकी होती. घरगुती सिलेंडरच्या या वाढलेल्या किंमतीमुळे सामान्य गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे. | LPG gas

मोठी बातमी: कॉमन मॅनचं बजेट कोलमडणार; घरगुती सिलेंडरच्या दरात इतक्या रुपयांची वाढ
LPG cylinder delivery
Follow us on

मुंबई: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराने चिंतेत असणाऱ्या व्यावसायिक, वाहतूकदार आणि सामान्य लोकांना आणखी एक धक्का बसणार आहे. कारण, घरगुती सिलेंडरच्या (LPG) थोडीथोडकी नव्हे तर 50 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानित सिलेंडरसाठी आता जवळपास 769 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी 14.2 किलो LPG सिलेंडर गॅसची किंमत 719 रुपये इतकी होती. घरगुती सिलेंडरच्या या वाढलेल्या किंमतीमुळे सामान्य गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले

देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol and Diesel) दर गगनला भिडत असल्याने लोकांचा खिसा खाली होत आहे. त्यामुळे आता मुंबईसारख्या आर्थिक राजधानी असलेल्या शहरातही लोक वाहनांनी प्रवास करताना दहावेळा विचार करत आहेत. पेट्रोलचा दर परवडत नसल्याने गाड्या बाहेर काढायच्या की नाही, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. पेट्रोलचे दर सातत्याने वाढत असल्याने आता बरेच ग्राहक पेट्रोलची खरेदी टाळत असल्याचे पेट्रोल पंपांवरील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुंबईत पेट्रोलचा आजचा दर 95.46 तर डिझेलचा दर 86.34 इतका आहे. गेल्या 24 तासांत पेट्रोल 25 आणि डिझेल 30 पैशांनी महागले आहे. तर पॉवर पेट्रोलचा दरही 98.24 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.

अर्थसंकल्पादिवशी कमर्शियल गॅस महागला

देशातील सर्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)ने कमर्शियल ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे. 19 किलो वजनाच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. कमर्शियल LPG सिलिंडरचे दर 190 रुपये प्रति सिलिंडरने वाढले आहेत. यापूर्वी गेल्या महिन्यात तेल मार्केटिंग कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत दोन वेळा 100 रुपयाने वाढ केली होती. कंपनीनं यापूर्वी 2 डिसेंबरला 50 रुपये आणि 15 डिसेंबरला 50 रुपयांनी प्रति सिलिंडरने वाढ केली होती.

महिन्याला किंमतीची समीक्षा

भारतात LPG गॅसची किंमत तेल कंपन्या ठरवतात. भारतात जवळपास अधिकाधिक घरांमध्ये LPG कनेक्शन आहेत. या गॅसचा उपयोग खासकरुन स्वयंपाकासाठी केला जातो. LPG गॅसच्या किमतीत झालेली वाढ ही खास करुन सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम करते. कारण सध्यस्थिती वाढलेल्या तेलाचे भाव आणि गॅसच्या किमतीचा फटका हा सर्वसामान्यांना बसतो. दरम्यान सरकार अनुदानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतं. त्याचबरोबर तेल कंपन्या नव्या योजना चालवून ग्राहकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करतात.

एलपीजी किंमत कशी तपासायची?

स्वयंपाक गॅसची किंमत तपासण्यासाठी आपल्याला सरकारी तेल कंपनीच्या वेबसाइटवर जावे लागेल. येथील कंपन्या दरमहा नवीन दर जारी करतात. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकला भेट देऊन आपण आपल्या शहरातील गॅस सिलिंडर्सचे दर तपासू शकता.

 

संबंधित बातम्या:

27 रुपयांचे पेट्रोल तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत 83 रुपयांचे कसे होते?

Petrol and Disel price: जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचा आजचा दर