
Jagadish Devada : ऑपरेशन सिंदूर राबवून भारतीय लष्कराने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. मात्र भारत पाकिस्तान तणावादरम्यान, भारताची बाजू मांडणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल भाजपाचे नेते तथा मध्यप्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी वादग्रस्त विधान केले. या विधानानंतर चांगलाच वाद निर्माण झाला. त्यानंतर आता मध्य प्रदेशच्याच उपमुख्यमंत्र्यांनी भारतीय सैन्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी देशाची सेना तसेच लष्कराबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. ते जबलपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सिव्हिल डिफेन्स व्हॉलेंटियर्सच्या प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते. संपूर्ण देश, देशाची सेना आणि सैनिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरणी नतमस्तक आहे, असं वादग्रस्त विधान त्यांनी या कार्यक्रमात केलंय. याच विधानाचा आधार घेत देवडा यांनी भारतीय सेनेचा अवमान केला आहे, असा आरोप केला जातोय.
या कार्यक्रमात बोलताना देवडा यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी तळं उद्ध्वस्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे पूर्ण देश कृतज्ञ आहे, असं ते म्हणाले. तसेच त्यांनी प्रेक्षकांना टाळ्यांचा कडकडाट करा असे सांगून नरेंद्र मोदी यांची स्तुती करण्याचे आवाहन केले.
मोदी यांच्या नेतृत्त्वात भारताने दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. देशाची सेना, सुरक्षा दल तसेच आपण सामान्य नागरिक मोदी यांच्या नेतृत्त्वात सुरक्षित आहोत, असं देवडा म्हणाले. देवडा यांनी सेनेच्या कर्तृत्त्वाला दुय्यम स्थान देत सर्व स्तुती मोदी यांचीच केली, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय.
दरम्यान, या विधानामुळे वाद निर्माण झाल्यानंतर देवडा यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मी केलेल्या विधानाची मोडतोड करून काँग्रेस पक्ष लोकांची दिशाभूल करत आहे. देशाच्या सेनेने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, असे मी म्हणालो होतो. देशाची पूर्ण जनता सेना तसेच सैनिकांच्या चरणी नतमस्तक आहे, असे मी म्हणालो होतो. माझ्या या विधानाला वेगळ्या पद्धतीने दाखवले जात आहे. मी देशाच्या सेनेचा पूर्ण सन्मान करतो, असे स्पष्टीकरण देवडा यांनी दिले आहे.