Maharashtra News LIVE : CJP कडून आज ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलन, दिल्लीत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था
Maharashtra News LIVE : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि सीजेपी नेत्यांना अटक केल्याप्रकरणात आज दिल्लीत लहरा दो तिरंगा हे आंदोलन होत आहे. तर राज्यात दुष्काळाच्या तोंडावर अनेक जिल्हे, तालुके आणि मोठ्या शहरात पाणी कपात करण्याचे धोरण राबवण्यात येत आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील भगवानगड परिसरातील शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. कल्याण–निर्मल राष्ट्रीय महामार्गावरील तुळजवाडी फाटा येथे बैलगाड्या आणि जनावरांसह रास्ता रोको करण्यात आला. जनावरांसाठी चारा, पिण्याचे पाणी आणि शेतकऱ्यांना हाताला काम मिळावे, अशा प्रमुख मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि पशुधनासमोर निर्माण झालेल्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
-
सिंधुदुर्गात अजूनही आंबा-काजू बागायतदार नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला. याबाबत शासन स्तरावर नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. यातून काही बागायतदारांना नुकसानीपोटी मदत जाहीर करण्यात आली. ही मदत तुटपुंजी असल्याचे बागायतदार सांगतात. तर काही बागायतदारांना मिळाली असली तरी अजूनही काही बागायतदार प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे. आकडेवारीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २९ हजार ३०८ बागायतदारांना ६४ कोटी ५३ लाख ०४ हजार ८४६ रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. तर २ हजार २१२ लाभार्थी शेतकऱ्यांची भरपाई मिळणे प्रलंबित आहे.
-
-
भंडारा जिल्ह्यात ५३ हजार हेक्टरचे पंचनामे पूर्ण
ट्रिगर १ अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील ६९३ गावांचा यामध्ये समावेश असून ३० हजार ४०१.८० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सध्या ३३३ गावांमधील ५३ हजार १२१ हेक्टरचे दुष्काळी पंचनामे पूर्ण झाले असून, यात ८३ हजार ९३८ खातेदारांची नोंद करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी पीकनुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे कडक निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
-
नवरात्रोत्सवात झेंडूच्या फुलांना महत्त्व, शेतकऱ्यांच्या शेतात फुलला भक्तीचा रंग
नवरात्रोत्सव सुरू झाला की सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं. देवीच्या पूजेसाठी, मंदिरांच्या सजावटीसाठी आणि घराघरांत होणाऱ्या घटस्थापनेसाठी झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असतं. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या काळात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. याच पार्श्वभूमीवर शेतांमध्ये झेंडूची फुलं बहरली असून, शेतकऱ्यांनीही मोठ्या आशेने झेंडूचं पीक घेतलं आहे. मात्र, सध्या झेंडूच्या फुलांना प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांचा बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी अपेक्षित दराच्या प्रतीक्षेत आहेत. दसऱ्याच्या सणाला फुलांची मागणी वाढेल आणि बाजारभावात सुधारणा होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
-
आज दिल्लीत सीजेपीचे लहरा दो तिरंगा मोर्चा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि सौरव दास, आशुतोष रांका या नेत्यांची धरपकड केल्याने कॉकरोच जनता पार्टी आज दिल्लीत लहरा दो तिरंगा मोर्चा काढणार आहे. दरम्यान मुंबईतील आझाद मैदानातही सीजेपीचे आंदोलन होणार आहे. त्यासाठी दिल्लीत कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. आजच्या आंदोलनात कोणतीही गडबड होऊ नये यासाठी सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून तैनात आहेत.
-
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह सीजेपी नेत्यांना अटक केल्याप्रकरणात आज दिल्लीत पक्षाने लहरा दो तिरंगा हे आंदोलन पुकारले आहे. आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या अटकेच्या निषेधार्थ हा मार्च काढण्यात येणार आहे. या तिरंगा मार्चसाठी कनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्क प्रशासकीय कारणासाठी दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडी सुद्धा ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहे. काँग्रेस नवीन आंदोलनाची रणनीती तयार करत आहे. सुप्रीम कोर्टातही याप्रकरणी सुनावणी सुरू असून राहुल गांधी यांच्या याचिकेत मुख्य निवडणूक आयुक्तांना नोटीस बजावण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात इंडिया आघाडीने जोरदार आंदोलन केले होते. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी दिल्लीत तगडा बंदोबस्त लावला आहे.
मुंबईत १० टक्के पाणी कुात आहे, दुष्काळाचं सावट आहे, धरणांचा पाहणी दौरा केलाय, मुंबईकरांना पाण्याची चिंता नाही मात्र पाणी जपून वापरा अशी विनंती मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केली आहे. राज्यातील अनेक बड्या शहरात, तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पाणी कपात करण्यात आली आहे. ऐन हिवाळ्यातच उन्हाळ्यात करण्यात येणारी पाणी कपात लागू झाल्याने ऐन उन्हाळ्यात काय स्थिती असेल याची चिंता नागरिकांना लागली आहे.
तर पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्यासाठी शिंदे शिवसेना बळ पुरवणार आहे. इथे मैत्रीपूर्ण लढतीचा नारा देण्यात आला आहे. अमरावतीमध्ये पण बंडखोरांनी महायुतीला नाकेनऊ आणले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मित्र पक्षात दिलजमाई न होण्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. तर दुसरीकडे दुष्काळी मदतीवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधल्यानंतर मित्र पक्ष राष्ट्रवादीनेही सरकारला घरचा आहेर दिला आहे. ही मदत पुरेशी नसल्याचे मत सुनील तटकरे यांनी मांडले आहे. यामुळे सरकारचे निर्णय सहमतीने होत नाहीत का? असा सवाल विचारल्या जात आहे. तर पुढील आठवड्यात परतीच्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन महिन्यात पावसाच्या खंडाने शेतकरीच नाही तर प्रशासन आणि सरकारही चिंतेत आहे. परतीच्या पाऊस पडल्यास मोठा दिलासा मिळणार आहे. तर मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष नोंदणी मोहिम राबवली जाणार आहे.
Published On - Oct 16,2026 7:59 AM
