केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 6,500 हून अधिक भाविकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं, यात्रा थांबली!
एसडीआरएफ, डीडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या 6,500 हून अधिक भाविकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

Kedarnath Yatra : दरवर्षी केदरानाथाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून हजारो भाविक उत्तराखंडमध्ये जातात. परंतु केदारनाथ मंदिरापर्यंत जाण्याचा मार्ग अतिशय खडतर आहे. या मार्गावर कधी भूस्खलन होईल हे सांगता येत नाही. प्रवासादरम्यान दुर्घटना झाल्याने आतापर्यंत अनेक भाविकांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान, आता केदारनाथमध्ये पुन्हा एकदा भूस्खलन झाले आहे. या भूस्खलनामुळे 6500 पेक्षा अधिक भाविक अडकले होते. त्यांना सुरक्षितपणे पाहेर काढण्यात आले आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन सोनप्रयागमध्ये केदारनाथची यात्रा थांबवण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
उत्तराखंडमधील केदारनाथ धामच्या पायी मार्गावर रविवारी दरड कोसळून कोसळली. यामुळे दगड-मातीचा मलबा आल्याने भाविकांच्या अडचणी वाढल्या. गौरीकुंडपासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या चीरबासा हेलिपॅडजवळ डोंगरावरून सतत दगड कोसळत असल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली. त्यामुळे केदारनाथहून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांना विविध ठिकाणी सुरक्षितपणे थांबवण्यात आले.
6,500 हून अधिक भाविकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले
सोमवारी सकाळी हवामान काहीसे सुधारल्यानंतर आणि दगड कोसळण्याचे प्रमाण थांबल्यानंतर बचाव पथकांनी मोठी मोहीम हाती घेतली. एसडीआरएफ, डीडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या 6,500 हून अधिक भाविकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. यात्रेच्या मार्गावर अडकलेल्या 600 ते 700 घोडे-खेचरांना धोकादायक भागातून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. भाविकांच्या सुरक्षेसाठी एसडीआरएफ, डीडीआरएफ, वायएमएफ आणि पोलिसांची बचाव पथके घटनास्थळी तैनात आहेत.
खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांना थांबवले
दरम्यान, प्रशासनाने मार्गावरील दगड, माती आणि मलबा हटवण्याचे काम सुरू केले आहे. मार्गाची स्वच्छता तसेच आवश्यक दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सोनप्रयाग येथे केदारनाथच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांना सध्या थांबवण्यात आले आहे. मार्ग पूर्णपणे सुरक्षित आणि वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतरच पुढील प्रवासाला परवानगी दिली जाणार आहे. दुसरीकडे प्रवासादरम्यान भाविकांनी स्वत:ची काळजी घ्यावी. गरज भासल्यास प्रशासनाकडे तत्काळ मदत मागावी, असे आवाहन तेथील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.