Explainer : जरांगेंना मुंबईत एन्ट्री नाहीच, पोलिसांनी परवानगी नाकारली, काय कारणं दिली? जरांगेंनी काय डाव टाकला? वाचा A टू Z
सरकार जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखत आहे. तर दुसरीकडे जरांगे यांना विरोधकांचा मिळणारा पाठिंबा वाढत आहे. जरांगेंनी पोलिसांना आव्हान देत बेकायदेशीरपणे मुंबई येणार अशी भूमिका जाहीर केलीय. तर काँग्रेसचे खासदार छत्रपती शाहू महाराजांनी जरांगेंना पाठिंबा देत जरांगेंना मुंबईत येऊ द्यावं, असं मत व्यक्त केलंय.

Maratha Reservation And Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतल्या उपोषणाला पोलिसांनी दुसऱ्यांदा परवानगी नाकारली आहे. सार्वजनिक सुव्यवस्थेवर बोट ठेवत पोलिसांना जरांगेंना आंदोलनासाठी गणेशोत्सवानंतर आणि तेही आझाद मैदानाच्या व्यतिरिक्त अन्य स्थळाचा विचार करावा असं सल्ला दिला. असे असले तरी जरांगेंनी मुंबईत एकटाच येणार पण येणार असा पवित्रा घेतला आहे. आता जरांगे यांनी आंदोलनाला परवानगी मिळावी यासाठी तिसऱ्यांदा अर्ज केला आहे. त्यांनी दोन पावलं मागे येत आमच्या आंदोलनाला 50 माणसं असतील असं सांगितलंय. त्यामुळे आता जरांगे यांची मुंबईतील आंदोलनाशी संबंधित भूमिका काय? मुंबई पोलिसांनी नेमकं काय म्हटलंय ते जाणून घेऊ या…
पोलिसांनी परवानगी नाकारताना काय कारणं दिली?
पोलिसांनी जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. ही परवानगी नाकारताना पोलिसांनी काही कारणं दिली आहेत. ‘आपण आंदोलनासाठी उपस्थित राहणाऱ्या आंदोलकांची संख्या तुलनेने कमी दर्शवली असली तरी याआधी आपण आंदोलकांना लाखो, करोडोंच्या संख्येने मुंबईत येण्याचं आवाहन केलेलं आहे. 45 लाख वाहनं मुंबईत आणणार, गनिमी काव्याने मुंबईत या तसंच परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच अशा आशयाची जाहीर वक्तव्य तुम्ही केलेली आहेत. पूर्वी परवानगी नाकारताना विचारात घेतलेल्या वस्तूस्थितीमध्ये बदल झालेला नाही. माननीय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांनी दिलेले निर्देश आणि नियमावलींचा भंग आपल्याकडून जाणीवपूर्वक करण्यात येईल, याबाबत खात्री पटलेली आहे. दक्षिण मुंबईतील सामान्य व्यवहार, जसे शाळा, रुग्णालय, न्यायपालिका आणि सार्वजनिक वाहतूक बाधित होऊन गंभीर प्रश्न निर्माण होईल. त्यामुळं आपण मागितलेली परवानगी नाकारण्यात येत आहे. आपण गणेशोत्सवानंतर आझाद मैदान सोडून इतर ठिकाणाची मागणी केल्यास परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल,’ असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.
जरांगे मुंबईकडे येण्यावर ठाम, पोलिसांसमोर आव्हान
जरांगे मात्र आंदोलन करण्यावर ठाम आहेत. जरांगे यांनी तिसऱ्यांदा आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. अंतरवालीतून आता एकटाच निघणार, 2 गाड्या, 2 अॅब्युलन्स सोबत असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या डावाच्या विरोधात माझा डाव असेल, असं जरांगे म्हणाले. गणेशोत्सावात मुंबईत आंदोलन योग्य नाही, असं आवाहन फडणवीस यांनी केलं होतं.
सरकारने काय काय निर्णय घेतले आहेत?
जरांगेंचं अंतरवाली सराटीत 17 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. जरांगे यांनी पाणी, सलाईन सोडलेलं आहे. 58 लाख नोंदींवरुन कुणबी जातप्रमाणपत्र द्या. हैदराबाद गॅझेटप्रमाणे सातारा आणि कोल्हापूरसह इतर गॅझेट लागू करा, अशी जरांगेंची मागणी आहे. तर सरकारनं जातप्रमाणपत्र देण्यास होकार दिलेला आहे. आणि नोंदीवरुन जातप्रमाणपत्राचं वाटप सुरु आहे. त्यासाठी सरकारनं मराठवाड्यात शिबिरंही लावली आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात 51 लाख 71 हजार 781 इतके जातप्रमाणपत्र वाटप झालेत. मराठवाड्यात एकूण 3 लाख 13 हजार 897 जातप्रमाणपत्रांचं वाटप झालं आहे. स्वतंत्र मराठा मंत्रालय स्थापन करा अशी जरांगेंची मागणी होती. सरकारनं मंत्रालयात स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन केला असून 5 अधिकारी, कर्मचारी नियुक्तही केले आहेत.
कुणबी जातप्रमाणपत्राबाबत सरकारची काय भूमिका?
जरांगेंच्या मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाटी सरकारनं महाधिवक्त्यांचं मत मागवलं आहे. कायदेशीर बाजू तपासून पावलं टाकू असं सरकारनं सांगितलं आहे. जात पडताळणी समितीकडून 4 लोकप्रतिनिधींचे रद्द झालेले कुणबी जातप्रमाणपत्र वैध करा अशी जरांगेंची मागणी आहे. सरकारने यावर, अपिल प्राधिकरण म्हणून विभागीय आयुक्तांना नियुक्त केलेलं आहे. त्यामुळं जरांगेंच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केलेल्या आहेत. काही मागण्या या कोर्ट आणि संवैधानिक गोष्टीच्या आधारावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
जरांगेना विरोधकांचा पाठिंबा
दरम्यान, सरकार जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखत आहे. तर दुसरीकडे जरांगे यांना विरोधकांचा मिळणारा पाठिंबा वाढत आहे. जरांगेंनी पोलिसांना आव्हान देत बेकायदेशीरपणे मुंबई येणार अशी भूमिका जाहीर केलीय. तर काँग्रेसचे खासदार छत्रपती शाहू महाराजांनी जरांगेंना पाठिंबा देत जरांगेंना मुंबईत येऊ द्यावं, असं मत व्यक्त केलंय. काँग्रेसेच नेते विजय वडेट्टीवारांनी जरांगेंसह सरकारवर हल्लाबोल केला आहे. वडेट्टीवारांनी, जरांगेंवर कारवाईची मागणी करत, हिंमत नसेल तर जरांगेंचे पाय चेपा, अशी बोचरी टीका सरकारवर केलीय. दरम्यान, मुंबई पोलिसांनी आणि सरकारनेही या आंदोलनाबात भूमिका स्पष्ट केली आहे. तर जरांगेही मुंबईच्या दिशेनं निघण्यावर ठाम आहेत. त्यामुळं जरांगे अंतरवाली सराटीहून निघाल्यावर काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
