Ahmedabad Plane Crash : एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, नोकरीसाठी लंडनला निघालेल्या रंजिताचा भीषण अंत
अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदांमध्ये कोसळले.मृतांमध्ये एका मल्याळी नर्सचाही समावेश आहे. जी नोकरीनिमित्त लंडनला निघाली होती.

अहमदाबाद विमान अपघातामुळे संपूर्ण देशात दुःखाचे वातावरण आहे. अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदांमध्ये कोसळले. या विमानात २४२ लोक होते, ज्यात २३० प्रवासी, १० क्रू मेंबर्स आणि २ पायलट होते. यातील २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका मल्याळी नर्सचाही समावेश आहे. जी नोकरीनिमित्त लंडनला निघाली होती, मात्र तिला या अपघातात जीव गमवावा लागला आहे.
रंजिता आर नायरचा मृत्यू
अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात एका मल्याळी नर्सचाही मृत्यू झाला. तिचे नाव रंजिता आर नायर (४०) आहे. रंजिता ही केरळमधील पठाणमथिट्टा येथील रहिवासी होती. ती ओमानमधील एका रुग्णालयात नर्स म्हणून म्हणून काम करत होती. अलीकडेच तिला यूकेमध्ये नोकरी मिळाली. ती यूकेमध्ये या विमानात बसली होती, मात्र या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला आहे.
रंजिताने केली होती केरळची पीएससी परीक्षा उत्तीर्ण
रंजिता आर नायर अभ्यासात हुशार होती. तिने अलीकडेच केरळमधील स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली होती. परंतु तिला नोकरीसाठी एकदा यूकेला जायचे होते. त्यामुळे ती आज एअर इंडियाच्या विमानाने लंडनला निघाली होती. मात्र विमानतळापासून थोड्या अंतरावर विमानाचा अपघात झाला व तिचा मृत्यू झाला. रंजिताच्या कुटुंबात तिची आई आणि २ मुले आहेत, त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
५३ ब्रिटिश नागरिकांचाही मृत्यू
एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सागितले की, प्रवाशांमध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता. या २४२ लोकांपैकी फक्त एकाचा जीव वाचला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र इतर सर्व लोकांना प्राण गमवावे लागले आहेत.
टाटाकडून 1-1 कोटींची मदत
या अपघातात मृत पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना टाटा सन्सकडून भरपाईची घोषणा करण्यात आली आहे. टाटा सन्सने याबाबत केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “या दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना टाटा ग्रुप १ कोटी रुपयांची मदत देईल. आम्ही जखमींचा वैद्यकीय खर्च देखील उचलू आणि त्यांना आवश्यक असलेली सर्व मदत मिळेल याची खात्री करू. तसेच आम्ही बीजे मेडिकलच्या वसतिगृहाच्या बांधकामात मदत करू. या अकल्पनीय घटनेत आम्ही बाधित कुटुंबांसोबत उभे आहोत.”