आधी हेमंत सोरेन आता अरविंद केजरीवाल यांचे ‘राजीनामाअस्त्र’, ममता बॅनर्जीही रांगेत… या अस्त्राचा राजकीय फायदा-तोटा कोणाला?
एकंदरीत तीन राज्याचे मुख्यमंत्री त्यांनीच रचलेल्या सापड्यात सापडले आहे. केंद्रीय तपास संस्थांना त्यांनीच संधी निर्माण करुन दिली आहे. हे तीन मुख्यमंत्री अडचणीत आले आहेत. परंतु या अडचणीचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आता याचा राजकीय लाभ त्यांच्या पक्षाला होणार की विरोधी पक्षाला होणार?

देशभरातील तीन राज्याचे मुख्यमंत्री सध्या चर्चेत आहेत. त्यातील दोन मुख्यमंत्री कारागृहात होते. कारागृहातून जामिनावर सुटल्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्याचवेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कारागृहात राहून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही. परंतु कारागृहातून बाहेर येताच राजीनामा देण्याची घोषणा करुन राजकीय डाव टाकला अन् जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला. त्याचवेळी कोलकोता अत्याचार आणि खून प्रकरणात डॉक्टर आक्रमक झाले आहेत. ममता बॅनर्जी डॉक्टरांची नाराजी दूर करु शकल्या नाही. त्यांनी माफी मागत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. एकंदरीत केंद्रात विरोधी पक्षाची भूमिका वठवणारे तीन राज्यातील मुख्यमंत्री ‘राजीनामाअस्त्र’ वापरण्याची भाषा करत आहेत. आधी हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अरविंद केजरीवाल राजीनामा देत आहेत. ममता बॅनर्जीसुद्धा राजीनामा देण्याची तयारी दर्शवत आहेत. हे तिन्ही नेते आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी राजीनाम्याचे हत्यार वापरत आहेत. परंतु या राजकीय हत्याराचा त्यांना फायदा होणार की तोटा? हे पाहणे गरजेचे आहे. ...
