मोमोज खायला आवडतात ? हे पाहा आणि मग ठरवा ; दुकानदाराने चक्क…

जबलपूरमधील एक व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यामध्ये एक व्यक्ती मोमोजसाठी लागणार पीठ मळताना दिसलाय, पण त्यासाठी त्याने जो पर्याय अवलंबला ते पाहून तुमच्या तोंडून ईईईईईईईई असेच उद्गार येतील.

मोमोज खायला आवडतात ? हे पाहा आणि मग ठरवा ; दुकानदाराने चक्क...
Image Credit source: social media
| Updated on: Sep 07, 2024 | 11:02 AM

आजकाल मोमोज खाण्याचा ट्रेंड खूपच वाढला आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यत, सर्वांनाच मोमोजची चव खूप आवडते. सगळेजण आवडीने मोमो खात असतात. तुम्हीही त्या लोकांपैकीच आहात का जे मोमोज आवडीने खातात ? असं असेल तर जरा थांबा, नुकताच एक व्हिडीओ समोर आलाय तो नीट बघा आणि मग ठरवा की तुम्हाला यापुढे मोमोज खाण्याची इच्छा आहे का ? मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील एका परिसरात मोमोज बनवतानाचा व्हिडीओ पाहिलात तर परत कधीच मोमोज खाऊ शकणार नाहीत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक इसम मोमोजसाठी लागणारं पीठ मळताना दिसतोय, पण ते पीठ तो चक्क पायाने मळत होता. हा व्हिडीओ व्हायरल होताच स्थानिक नागरिक आणि इतर व्ह्यूअर्सही हैराण झाले आहेत. पायाने पीठ मळणाऱ्या त्या व्यक्तीविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्थानिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत याप्रकरणी दोन तरूणांना अटक केली आहे.

जबलपूरच्या बरगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली, जिथे राजस्थानमधील दोन तरुणांनी मोमोजचे दुकान थाटले आहे. राजकुमार गोस्वामी आणि सचिन गोस्वामी हे पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तहसील चौकात मोमोजचे दुकान चालवायचे. मात्र व्हिडिओमध्ये जे दिसले त्यामुळे लोकांमध्ये संताप तर निर्माण झालाच पण त्यामुळे अन्न सुरक्षा मानकांवरही प्रश्न निर्माण झाले आहेत. तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली.

चक्क पायाने मळलं पीठ

या व्हिडिओमध्ये तो तरूण मोमोजसाठी चक्क पायाने पीठ मळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये हा तरुण बराच वेळ दोन्ही पायांनी मोमोजचे पीठ मळताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांना मोठा धक्का बसला. हा प्रकार लक्षात आणून देत स्थानिकांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. ग्रामपंचायत बारगीच्या सरपंच मंजू चौकसे यांच्यासह ग्रामस्थांनी पोलीस ठाणे गाठले. मोमोचे पीठ पायाने मळून लोकांना त्याच पीठाचे मोमोज खायला घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

 

पोलिसांनी दोघांना केली अटक

हे दोन्ही तरुण राजस्थानमधील जोधपूर येथील रहिवासी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. राजेंद्र हा जबलपूरच्या बरगी भागात चौकसे नावाच्या व्यक्तीच्या घरात भाड्याने राहत होता आणि व्यवसाय करत होता. स्थानिकांच्या संताप आणि तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 151 अन्वये कायदेशीर कारवाई केली आहे. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास अन्न विभागाकडे सोपविला आहे, जेणेकरून अन्नाचा दर्जा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने पुढील कारवाई करता येईल.