
राजधानी नवी दिल्लीत आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकंतच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जोरदार भाषण केले. मराठीत भक्ती आहे, शक्ती आहे आणि युक्तीही आहे. संघामुळेच मला मराठी भाषा अवगत झाली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
“संघामुळेच मला मराठी भाषा अवगत झाली. काही दिवसापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. देश आणि जगात १२ कोटीहून अधिक मराठी भाषिक लोक आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही कोट्यवधी मराठी भाषिकांची इच्छा होती. दशकांपासून हे काम अपूर्ण होतं. मला ते पूर्ण करण्याची संधी मिळाली. हे माझं भाग्य आहे. भाषा केवळ संवादाचं माध्यम नाही. भाषा ही संस्कृतीची वाहक आहे. भाषा समाजात जन्म घेत असते. पण भाषा समाजाच्या निर्माणात तेवढीच महत्त्वाची भूमिका निभावते”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.
“मराठीने सांस्कृतिक निर्माण केलं आहे. रामदास स्वामी म्हणायचे मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा” “आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे” “महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे” मराठीत सौंदर्य आहे, संवेदना आहे. समानता आहे आणि समरसता आहे. त्यात अध्यात्मिकतेचे स्वर आहेत आणि आधुनिकता आहे. मराठीत भक्ती आहे, शक्ती आहे आणि युक्तीही आहे. भारताला अध्यात्मिक ऊर्जेची गरज पडली. तेव्हा मराठी संतांनी ऋषींच्या तत्वज्ञानाला सोप्या भाषेत सांगितलं. महाराष्ट्रातील कितीतरी संतांनी भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून मराठी भाषेतून समाजाला नवीन दिशा दाखवली. आधुनिक काळात ग दी माडगुळकर आणि सुधीर फडक्यांच्या गीत रामायणाने जो प्रभाव टाकला तो सर्वांना माहीत आहे”, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
“मराठीने इतर भाषेतील साहित्य घेतलं आणि त्या भाषांनाही समृद्ध केलं. मामा वरेरकरांनी आनंद मठाचं भाषांतर केलं. विंदा करंदीकर यांचं साहित्य तर किती तरी भाषेतत् गेलं. भारतीय भाषांमध्ये कधीच वैर राहिलं नाही. भाषने नेहमीच एक दुसऱ्यांना आपलंसं केलं आहे. एकमेकांना समृद्ध केलं आहे. पण अनेकदा भाषेच्या नावाने भेद भाव केला जातो. तेव्हा आपल्या भाषेतून उत्तर दिलं जातं. या भेदभावापासून दूर राहिलं पाहिजे. भाषा जपल्या पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. आपण सर्व भाषांमधील शिक्षणाला प्रोत्साहन देत आहे”, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.
“आपलं साहित्य समाजाचा आरसा असतं. साहित्य समाजाचं पथप्रदर्शक असतं. त्यामुळे साहित्य संमेलनासारख्या कार्यक्रमाची देशात महत्त्वाची भूमिका असते. गोविंद रानडे, हरी नारायण आपटे, आचार्य अत्रे, सावरकर यांनी आदर्श निर्माण केले आहे. साहित्य महामंडळ ही परंपरा पुढे नेईल अशी आशा करतो”, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.