दाजी लैच भारी… चक्क वरातीत मेहुण्यांना घातला एक-एक कोटी रुपयांच्या नोटांचा हार, सर्वच थक्क!
मथुरा येथील वरातीत दाजी योगेश कुमारने दोन्ही मेहुण्यांना प्रत्येकी एक कोटी रुपयांच्या नोटांचा हार घालून सर्वांनाच थक्क केले. हा अद्वितीय आणि वजनदार हार घालण्यासाठी नवरदेवांना छतावर उभे राहावे लागले. या दिलदार कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून देशभरात याची चर्चा सुरू आहे.

काही नाती ही अतूट असतात. त्याला तोड नसते. रक्ताच्या नात्यापेक्षाही ही नाती अत्यंत घट्ट असतात. त्यात मेव्हणा आणि साल्याचं नातं तर अधिकच घट्ट असतं. बायकोची बहीण आणि भावासाठी काहीही करायला दाजी तयार असतोच असतो. रात्री अपरात्री तो त्यांच्या हाकेला धावून जात असतो. काही दाजी तर एवढे दिलदार असतात की ते काहीही करायला तयार असतात. उत्तर प्रदेशातील मथुरेतही मेव्हुणा आणि साल्याचं हे अनोखं प्रेम पाहायला मिळालं. त्यामुळे सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत.
मथुराच्या सुरीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगला फोंदा येथे प्रशांत आणि कान्हा राघव या दोन्ही मेव्हण्यांना घोड्यावर बसण्यापूर्वी दाजी योगेश कुमार ऊर्फ भुरा ठाकूर यांनी प्रत्येकी एक एक कोटींच्या नोटांचा हार घातला. दोघांचेही लग्न गोवर्धनच्या मुडसेरस गावातील तरुणींशी ठरलं होतं. त्यामुळे प्रचंड खूश झालेल्या दाजीने दोन्ही मेव्हुण्यांना गिफ्ट म्हणून 500 रुपयांच्या नोटांचा हार घातला. अत्यंत वजनदार आणि मोठा हार घालण्यासाठी दोन्ही नवरदेवांना घराच्या छतावर उभं करण्यात आलं. लोकांच्या मदतीने त्यांना उभं केलं गेलं आणि त्यानंतर दोघांनाही 500 रुपयांच्या नोटा असलेला प्रत्येकी एक कोटी रुपयांच्या नोटांचा हार घालण्यात आला.
अन् गावकरी धावून आले
नगला फोंदा येथील रहिवाशी योगेंद्र सिंह आणि कुशपाल सिंह यांचे चिरंजीव प्रशांत आणि कान्हा राघव यांची वरात शनिवारी सायंकाळी 5 वाजता निघणार होती. त्यामुळे दोघांसाठी घोडे सज्ज होते. घोड्यावरून वरात जाणार होती. त्यामुळे दाजीने योगेश कुमारने आपल्या मेव्हुण्यांसाठी नोटांचा मोठा हार तयार केला. हा हार इतका मोठा आणि वजनदार होता की त्याला सांभाळण्यासाठी गावातील लोकांची मदत घ्यावी लागली. हार गळ्यात घातला असता तर तो जमिनीला टेकला असता. त्यामुळे दोन्ही नवरदेवांना घराच्या छतावर उभं केलं आणि त्यांना नोटांचा हार घातला गेला.
व्हिडीओ व्हायरल, चर्चा तर होणारच
योगेश कुमार ऊर्फ भुरा ठाकूर हे राजस्थानच्या कामा येथील नंदोला गावाचे रहिवाशी आहेत. ते काम्या गावचे सरपंच आहेत. मेव्हुण्यांसाठी दोन कोटीचे दोन हार घेतल्याचा त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गावकरी आणि नातेवाईकांनी आपल्या मोबाईलमध्ये हार घालण्याचा कार्यक्रम शूट केला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडीओची देशभर चर्चा होत आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
शेतकरी नेत्याचे भाचे
दोन्ही नवरदेव हे शेतकरी नेते महावीर स्वामी यांचे भाचे असल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरूनही सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत.