Rapido Strike : आज रॅपिडो विरोधात संप पण शशांक राव यांच्या युनियनचा मोठा निर्णय, घेतली जनतेला दिलासा देणारी भूमिका
Rapido Strike : रॅपिडो किंवा अन्य प्लॅटफॉर्मवर कोण रजिस्टर होतं, हे कुठेच तपासलं जात नाही. पोलीस व्हेरिफिकेशन होत नाही. अॅपवर कागदपत्रं दिली की लगेच ऑनबोर्ड केलं जातं.

रॅपिडोच्या विरोधात ऑटो-टॅक्सी युनियनने आज संप पुकारलाय. पण मुंबई-एमएमआरडीमध्ये आज बंद नाहीय. ऑटो-टॅक्सी सुरूच राहणार, शशांक राव अध्यक्ष असलेल्या मुंबई-ऑटो रिक्षा टॅक्सीमेन्स युनियनने हा निर्णय घेतला आहे. राज्यात काही संघटनांनी बंद पुकारला.पण मुंबई-एमएमआरडीमध्ये आम्ही बंदमध्ये सहभाग घेतलेला नाही असं शशांक राव म्हणाले. त्यांची मुंबई एमएमआरडीए क्षेत्रात मोठी यूनियन आहे. बेकायदेशीर बाईक टॅक्सीला पहिला विरोध आमचाच आहे. 15 दिवसांचा अल्टिमेटम देतोय. सीएनजीवर सबसिडी द्या, चालकांवर आणि जनतेवर भार पडू नये असं शशांक राव म्हणाले.
आजच्या बंदत आम्ही सहभागी नाही. काही संघटनांनी राज्यभरात बंद पुकारला आहे, पण मुंबई आणि एमएमआरडीमध्ये आम्ही बंदची भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आज मुंबई-एमएमआरमध्ये ऑटो रिक्षा आणि टॅक्सी सुरू आहेत. बाईक टॅक्सीला पहिला विरोध आमचाच आहे. रॅपिडो आणि अन्य बाईक टॅक्सी कंपन्यांकडून बेकायदेशीरपणे बाईक टॅक्सी चालवल्या जात आहेत, याला सर्वप्रथम विरोध मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सीमेन्स युनियन आणि संयुक्त कृती समितीने केला होता असं शशांक राव म्हणाले.
परिवहन आयुक्तांसोबत बैठक
गेल्या आठवड्यात आमच्या कृती समितीच्या सर्व संघटनांच्या नेत्यांची परिवहन आयुक्तांसोबत बैठक झाली. त्यात बेकायदेशीर बाईक टॅक्सीचा मुद्दा मांडला. तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली.
कोणतीही तपासणी नाही, हाच धोका
रॅपिडो किंवा अन्य प्लॅटफॉर्मवर कोण रजिस्टर होतं, हे कुठेच तपासलं जात नाही. पोलीस व्हेरिफिकेशन होत नाही. अॅपवर कागदपत्रं दिली की लगेच ऑनबोर्ड केलं जातं. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोकही बाईक टॅक्सी चालवत आहेत. हे जनतेसाठी अत्यंत चुकीचं आणि भीतीदायक आहे.
15 दिवसांत कारवाईची मागणी
बेकायदेशीरपणे भाडे घेणाऱ्या बाईक टॅक्सींवर 15 दिवसांच्या आत कारवाई सुरू करावी, अशी मागणी आम्ही केली आहे. त्यांनी तत्वतः मान्य केलं आहे. येत्या 15-20 दिवसांत कारवाई सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. आश्वासन पूर्ण झालं नाही, तर 15-20 दिवसांनंतर पुढची भूमिका घेऊ.
नुकसान ऑटो-टॅक्सी-कॅब चालकांचं
बेकायदेशीर बाईक टॅक्सीमुळे ऑटो रिक्षा चालक-मालक, टॅक्सी चालक-मालक आणि अॅग्रीगेटर कॅब ड्रायव्हर्सचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. अॅप प्लॅटफॉर्मवर बाईक रजिस्टर होण्यालाच बंदी आली पाहिजे.
सरकारच्या पॉलिसीनुसारच सेवा द्या
कोणतीही सेवा आली तरी भाडं नाकारणं योग्य नाही. पण सरकारने ई-बाईक टॅक्सीसाठी जी पॉलिसी बनवली आहे, त्यानुसारच सेवा द्यावी. बेकायदेशीरपणे कसं चालू देणार?
भाडेवाढ आणि सीएनजी सबसिडीची मागणी
अलीकडेच झालेली भाडेवाढ अपुरी आहे. त्यानंतर दोनदा सीएनजी वाढला आहे. त्यामुळे सीएनजीवर सबसिडी द्यावी, अशी आमची मागणी आहे. जेणेकरून रिक्षा चालकांना त्रास होणार नाही आणि जनतेवरही भार पडणार नाही.
