मेटाने वाचवले तरुणीचे प्राण, बॉयफ्रेंडने ब्लॉक करताच विष घेतले, अलर्ट मिळताच पोलीस पोहचले

फेसबुक, इंस्टाग्रामवर लाखो पोस्ट पडत असतात. अनेक पोस्टी आपण वाचतही नाही. परंतू इंस्टाग्रामवर पडलेल्या एका पोस्टने मेटा अलर्ट झाली. आणि त्यांनी एका तरुणीचे प्राण वाचवल्याची घटना घडली आहे.

मेटाने वाचवले तरुणीचे प्राण, बॉयफ्रेंडने ब्लॉक करताच विष घेतले, अलर्ट मिळताच पोलीस पोहचले
| Updated on: Sep 02, 2025 | 8:10 PM

प्रियकराने नंबर ब्लॉक केल्यानंतर तणावात आलेल्या एका बीएच्या विद्यार्थीनीने तणावात येऊन विषारी पदार्थ खाल्ल्याची घटना घडली होती. त्यानंतर या विद्यार्थीनीने इंस्टाग्रामने जीवन समाप्त करत असल्याची पोस्ट टाकली. ही पोस्ट व्हायरल होताच सोशल मीडिया कंपनी मेटाची निगराणी करणारी टीम अलर्ट झाली. त्यांनी उत्तर प्रदेशातील पोलिस मुख्यालयाला अलर्ट पाठवला. उत्तर प्रदेश पोलिस मुख्यालयातून मिळालेल्या माहिती आधारे बरेली पोलिसांनी अवघ्या 16 मिनिटांत या विद्यार्थीनीच्या घरात पोहचून तिचे प्राण वाचवल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थीनीवर उपचार सुरु असून तिला आता कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात येते.

उत्तर प्रदेशातील बरेलीच्या सीबीगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहाणारी 20 वर्षांची ही विद्यार्थीनी बीएच्या तृतीय वर्षाला आहे. तिने तिच्या मोबाईलवरुन इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली. त्यात तिने सल्फासच्या गोळ्यांचे पाकिट दाखवत जीवन संपण्याची पोस्ट टाकली. त्यानंतर मेटाच्या सुरक्षा टीमने या पोस्टला गंभीरतेने घेत उत्तर प्रदेशातील पोलीस मुख्यालयाच्या सोशल मीडिया सेंटरचा ईमेल अलर्ट पाठवला. अलर्ट मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने बरेली पोलिसांनी सूचना केली.

लोकेशन ट्रेस करत पोलीस पोहचले

अलर्ट मिळताच सीबीगंज पोलिसांना विद्यार्थीनीचा मोबाईल नंबर शोधून काढला. लोकेशन मिळतात केवळ 16 मिनिटात पोलीस तिच्या घरात पोहचले. जेव्हा पोलिस कर्मचारी या विद्यार्थीनीच्या घरात पोहचले तेव्हा तिची तब्येत बिघडली होती. तिला उलट्या होत होत्या. तिला तिच्या नातेवाईकांच्या मदतीने तिला प्राथमिक उपचार देण्यात आले. उपचार सुरु झाल्यानंतर तिच्या तब्येतीत सुधारणा झाली. डॉक्टरांनी सांगितले की वेळेत आणल्याने तिचे प्राण वाचले आहेत, अन्यथा परिस्थिती बिकट झाली होती.

तरुणीचे काऊन्सिलिंग केले

उपचारानंतर महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी या तरुणीचे काऊन्सिलिंग केले. त्यावेळी तिने सांगितले की काही काळापूर्वी तिची इंस्टाग्रामवर एका तरुणाशी मैत्री झाली होती. हळूहळू त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, दोघांचे नंतर बिनसले. वाद इतका झाला की तरुणाने तिच्याशी बोलणे बंद केले आणि तिचा मोबाईल फोन नंबर ब्लॉक केला. यामुळे ती तणावात आली आणि तिने विष खाल्लाचे तिने पोलिसांना सांगितले.

पोलिसांचे आभार मानले

महिला पोलिसांनी या विद्यार्थीनीची समजूत घातली आणि आत्महत्या करणे हा काही मार्ग नाही. जीवनात अडचणी येत रहातात.परंतू त्यावर चर्चा करुन कुटुंबियांशी बोलून मार्ग काढता येतो असे पोलिसांनी सांगितले. तसेच अभ्यासावर लक्ष देण्यास सांगितले. तिच्या कुटुंबियांनी पोलिसांचे आभार मानले. या प्रकरणाची बरेलीत चर्चा सुरु असून मेटाच्या तप्तरता आणि पोलिसांनी तातडीने दिलेला प्रतिसाद यामुळे तरुणीचे प्राण वाचल्याने यंत्रणांचे कौतूक होत आहे.